नाशिकला महापुराचे संकेत; नारोशंकर मंदिराचे छत बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 10:16 AM2019-08-04T10:16:15+5:302019-08-04T10:16:50+5:30
नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नदीच्या पुराचे मापक असलेला दुतोंडया मारुती शुक्रवारी रात्रीच पाण्याखाली बुडाला.
नाशिक - मागील दोन दिवसांपासून नाशिक शहरात जोर धरलेल्या पावसाची संततधार रात्रीपासून अधिकच वाढली आहे. शहारात सकाळी 8 वाजेपर्यंत 80मिमी पाऊस पडला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून दर तासाला 3 हजार क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग केला जात आहे. आज सकाळच्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणातून सकाळी साडे 9 वाजता 23 हजार 445 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू गेला. तसेच होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग ३० हजार क्युसेकपेक्षा अधिक असून धोक्याची पातळीच्या अधिक वर गोदावरी वाहू लागली आहे.
नारोशंकर मंदिरावरील घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. मंदिरचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. नदीच्या पुराचे मापक असलेला दुतोंडया मारुती शुक्रवारी रात्रीच पाण्याखाली बुडाला. महापुराचे संकेत देणाऱ्या नारोशंकर मंदिराच्या घंटेला पाणी लागण्याची शक्यता आहे. कारण या मंदिराचे छत पाण्याखाली गेले असून केवळ घंटा आणि कळस नजरेस पडत आहे. विसर्गात वाढ झाल्यास आणि शहारत पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास घंटेपर्यंत पुर पातळी पोहचू शकते. तसे झाल्यास गोदावरीला महापूर येईल. गाडगे महाराज पुलाच्या खाली पाणी लागल्याची माहिती आहे. याठिकाणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी गर्दी करणाऱ्या नाशिककरांना सावधानतेचा इशारा देत आहेत.
आज सकाळी ९वाजेनंतर गोदाकाठालगत सर्व मंदिरे पाण्याखाली गेली. पिंपळ चौक नेहरु चौकाच्या दिशेने पुराचे पाणी जाण्याची शक्यता वाढली आहे. बालाजी कोट, कापड बाजार, सराफ बाजार, भांडी बाजार जलमय झाला आहे. टाळकुटेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून येथील अमरधाम स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन प्रशासन करत आहे. नदीकाठी ठिक ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, पोलिस तैनात असून मनपा तसेच जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन सद्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गोदावरीचा बापू पुल पाण्याखाली गेला आहे. तसेच घारपुरे घाट पुलावर वाहतूक बंद करण्यात येत आहे. या पुलावरून देखील पाणी थोड्या वेळात वाहणार आहे. पोलिसांनी बँरेकेटिंग करायाला सुरवात केली आहे.
नाशिककरांनी गरज असेल तरच बाहेर पडावे; 'संडे' पावसाळी पर्यटन टाळा
गरज असल्यास बाहेर पडावे, पावसाळी पर्यटन टाळावे शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसामुळे धबधबे, नद्या, नाले, ओहळ ओसंडून वाहत आहे. धोक्याची पातळी गाठल्याची दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कुठल्याही पर्यटन स्थळे जाणे धोक्याचे ठरणारे आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
गोदावरीला आलेला पूर बघण्यासाठी नाशिककर जनतेने बाहेर पडू नये प्रसारमाध्यमद्वारे पूरस्थिती जाणून घेण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी यांनी केले आहे.