मुसळधार पावसाने रस्ते गेले वाहून
By Admin | Published: September 19, 2015 11:19 PM2015-09-19T23:19:32+5:302015-09-19T23:20:13+5:30
बागलाण : पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला
निकवेल : बागलाण पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागामध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस झाला असून, या भागातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने निकृष्ट रस्त्या पाण्यामध्ये वाहून गेले आहेत. यात वाठोडा (बारीपाडा) ते वग्रीपाडा रस्त्यादरम्यानचा आरम नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता वाहून गेला आहे. केवळ पूल फक्त शिल्लक राहिला आहे. तर रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. पुलाचा निम्मा भाग हा पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याने रस्त्याचे काम मजबूत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा रस्ता ज्या ठेकेदारांनी केला आहे तसेच ह्या रस्त्यावर ज्या अधिकारीची देखरेखीची जबाबदारी होती अशा अधिकाऱ्यांवरही कडक कारवाईची मागणी होत आहे. तसेच संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे उत्कृष्ट काम करण्यात यावे अशीही मागणी होत आहे. या भागातील डांगसौंदाणे-वाठोडा रस्त्यादरम्यानही वाठोडा गावाशेजारील रस्ता वाहून गेला असून, परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून सटाणा-वाठोडा बस सेवा खंडित झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे खचल्याने मात्र संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी अद्याप घटनास्थळापर्यंत न पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. डांगसौदाणे ते साल्हेर गावादरम्यानचा पूलही वाहून गेल्याने या पट्ट्यातील २० ते २५ गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील ग्रामस्थांना, डांगसौंदाणे, सटाणा, नाशिक आदि ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वाठोडा (बारीपाडा) भागामध्ये गुरुवारी, शुक्रवारी मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात अनेक शेतकऱ्याचे इलेक्ट्रिक मोटारी, पाइपलाइनचे पाइप, मोटरची केबल, स्टार्टर आदि शेती उपयोगी साहित्य पाण्यामध्ये वाहून गेले. तसेच अनेक पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तत्काळ या भागामध्ये दौरा करून संपर्क तुटलेल्या रस्त्याच्या गावांचा व पुलाची दुरुस्ती व नूतनीकरण तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सोमनाथ सूर्यवंशी वाठोडाचे सरपंच भाऊराव ठाकरे, मोहन ठाकरे, तुकाराम ठाकरे, लक्ष्मण महाले, नानाजी महाले, मोहन पवार, शिवाजी चौरे, पोपट पवार, बाळू पवार आदि ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)