पेठ तालुक्यात जमिनीला पडलेल्या ‘त्या’ भेगा अतिवृष्टीमुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 02:33 PM2019-08-25T14:33:17+5:302019-08-25T14:33:37+5:30
पेठ तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान घोटविहीर, लिंगवणे व त्यानंतर मोहदाड या गावातील डोंगरांना मोठमोठया भेगा गेल्याने घाबरलेल्या नागरिकांना भूगर्भशास्त्र विभागाने दिलासा दिला आहे. सदरच्या भेगा भूकंपामुळे नाही तर अतिवृष्टीमुळे पडल्याचा निष्कर्ष या विभागातर्फे काढण्यात आला आहे.
पेठ : तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान घोटविहीर, लिंगवणे व त्यानंतर मोहदाड या गावातील डोंगरांना मोठमोठया भेगा गेल्याने घाबरलेल्या नागरिकांना भूगर्भशास्त्र विभागाने दिलासा दिला आहे. सदरच्या भेगा भूकंपामुळे नाही तर अतिवृष्टीमुळे पडल्याचा निष्कर्ष या विभागातर्फे काढण्यात आला आहे.
डोंगर उतारावर असलेल्या घोटविहीर पैकी उंबरमाळ गावाच्या डोंगराला आडव्या भेगा पडल्यामुळे माळीण सारखी आपत्ती ओढविण्याच्या भीतीने नागरिकांसह प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार हरिष भामरे व पोलीस निरीक्षक शिवाजी बढे यांनी रात्रीतून उंबरमाळच्या ग्रामस्थांना नजीकच्या करंजपाडा गावात सुरक्षित ठिकाणी हलविले. त्या पाठोपाठ लिंगवणे, रानविहिर, शिवशेत या भागातही अशाच भेगा पडल्याने हा भूकंपसदृष प्रकार असल्याच्या भीतीने पेठ तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले होते.
विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार हरिष भामरे यांनी भूवैज्ञानिक विभागाच्या अधिकाऱ्यांसह भेगा पडलेल्या भागाची पाहणी करून अहवाल सादर केला. त्यामध्ये सदरच्या भेगा अतिवृष्टीने खडकात मुरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पडल्याचा अहवाल दिला आहे. दोन बेसाल्ट जातीच्या खडकात पाणी मुरल्याने जमिनीला अशा प्रकारच्या भेगा पडत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे भूकंप झाल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन तहसीलदार हरीष भामरे यांनी केले आहे.