पालिका गाळ्यांची भाडेवाढ स्थगित
By admin | Published: December 18, 2015 12:24 AM2015-12-18T00:24:32+5:302015-12-18T00:26:42+5:30
महापौरांचे आदेश : महासभा घेणार अंतिम निर्णय
नाशिक : महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांची प्रचलित बाजारमूल्यानुसार केलेली अवाजवी भाडेवाढ स्थगित ठेवण्याचे आदेश देत महापौर अशोक मुर्तडक यांनी याबाबत महासभा अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. सदस्यांनी अवाजवी भाडेवाढीसंबंधी सभागृहाचे लक्ष वेधल्यानंतर महापौरांनी सदर निर्णय दिला.
शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत आयुक्त डॉ. गेडाम यांनी २४ जून २०१५ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पालिका बाजारातील गाळ्यांची करारनाम्याची मुदत संपुष्टात आलेल्या १२८७ गाळ्यांसाठी लिलावप्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु समितीने सदर प्रस्ताव फेटाळून लावत संबंधित गाळेधारकांना प्रचलित बाजारमूल्यानुसारच (रेडीरेकनर) भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर संबंधितांना तीनऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली होती. तसेच थकबाकीदारांचे गाळे सील करण्याची कारवाई करतानाच पोटभाडेकरूंची तपासणी करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचेही आदेश सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले होते. स्थायी समितीने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करत प्रशासनाने पालिका बाजारातील गाळ्यांना भाडेवाढीच्या नोटिसा बजावल्या. परंतु गाळेधारकांना ४०० वरून ४००० रुपये भाडे आकारणी करण्यात आल्याने गाळेधारकांमध्ये संतापाची लाट उसळली. याचबरोबर काही गाळेधारकांना लक्षावधी रुपयांच्या थकबाकीच्या नोटिसा काढल्या गेल्या. या अवाजवी भाडेवाढीविरोधी गाळेधारक एकवटले आणि त्यांनी संघटनाही स्थापन करत त्याला तीव्र विरोध दर्शविला. मात्र, सदरचा निर्णय हा शासनाच्याच परिपत्रकाच्या आधारे घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.