वाढत्या तपमानामुळे जनावरांना गोचीड तापाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 05:51 PM2019-04-26T17:51:30+5:302019-04-26T17:52:48+5:30
मानोरी : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येवला तालुक्यात मागील दोन दिवसापासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढल्याने माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्यावरदेखील उष्णतेचा परिणाम होत आहे. मानोरी बुद्रुक, देशमाने, वाहेगाव, मुखेड फाटा आदि परिसरात शुक्रवारी तपमानाने चाळीशी पार केल्याने जनावरांना गोचीड ताप , भुळकंड आणि अशक्तपणाची लागण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
आधीच दुष्काळाशी दोन हात करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलेली असताना त्यात वाढत्या तपमानाने भर घातली आहे. उन्हाच्या तीव्रतेत भरमसाठ वाढ झाल्याने अंगाची लाही लाही होत असताना जनावरांना गोचीड तापाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. जनावरांच्या शरीराचे तपमान उन्हामुळे १०५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून या गोचीड तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन हजार रु पयांहून अधिक खर्च करावा लागत आहे. आधीच शेतीच्या उत्पादनातून एक रुपयाही फायदा झालेला नसून त्यात दुधाला प्रती लिटर १८ ते २० रुपयांचा दर मिळत असल्याने त्यातून जनारांच्या खाद्याचा खर्चही वसूल होत नसल्याने जनावरांचा गोचीड ताप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची माहिती पशुतज्ज्ञ डॉ. संदीप शेळके यांनी दिली. या वाढलेल्या तपमानामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या दुग्ध उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच ऐन दुष्काळात जनावरे सांभाळणे आवाक्याबाहेर झालेले असताना महागड्या दराने चारा खरेदी करून शेतकरी दुग्ध व्यवसाय शेतकरी करीत आहेत. या गोचीड तापामुळे दररोज दुध उकीरड्यावर फेकून देण्याची नामुष्की शेतक-यांवर ओढवली आहे. उन्हाची स्थिती पुढील काही दिवस अशीच राहिल्यास जनावरे दगावण्याची देखील भीती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे. त्यामुळे चाळीशी पार केलेल्या तपमानात पुढील काही दिवस जनावरांची निगा राखणे शेतक-यांसाठी कसरतीचेच ठरणार आहे.