‘जलयुक्त’मुळे ढेकू शिवार झाले जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:48 PM2018-09-06T23:48:08+5:302018-09-06T23:48:13+5:30
नाशिक : नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाऱ्याच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकू गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू शिवारात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनाही जलसंधारणाचे महत्त्व ध्यानी आले आहे.

नांदगाव तालुक्यातील ढेकू बुद्रूक आणि ढेकू खुर्द अशा दोन्ही गावांत पाणीटंचाई असल्याने उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. विहिरीची पाणीपातळी जानेवारीनंतर खालवत असल्याने त्यानंतर पिके घेणे कठीण होत असे. परंतु ‘जलयुक्त शिवार’ योजनेत गावाची निवड झाली आणि या गावाचे रूपच पालटले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोन्ही गावांत विविध यंत्रणांमार्फत २८ कामे पूर्ण करण्यात आली. यावर १९ लाख रु पये खर्च करण्यात आला. गाळ काढण्याच्या कामात लोकसहभागही चांगला मिळाला.
एकूण दोनशे हेक्टर क्षेत्रावर कामे घेण्यात आली. ढेकू बुद्रूक गावाची पाण्याची एकूण गरज ३३३ टीसीएम असताना पाणीसाठा २२४ टीसीएम होता. नव्या कामांमुळे २०५ टीसीएम अतिरिक्त पाणीक्षमता निर्माण झाल्याने पाऊस चांगला आल्यास रब्बीच्या पिकांसाठीदेखील पाणी उपलब्ध होणार आहे. ढेकू खुर्द गावात पाण्याची गरज ४२० टीसीएम असताना जलयुक्तच्या कामांमुळे एकूण ४२८ टीसीएम पाणीक्षमता निर्माण झाली आहे. दोन्ही गावांत आॅगस्ट महिन्यातील चांगल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. तयार करण्यात आलेल्या मातीला बांध व गॅबिअन बंधाºयामुळे पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर क्षेत्र उपचारामुळे भूजल पातळीतही वाढ झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
नांदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत माथा ते पायथा कामे झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊन खरिपानंतर शेतकºयांना दुसरे पीकही घेणे शक्य होणार आहे. -विजय पवार, तालुका कृषी अधिकारी
कम्पार्टमेंट बंडिंगच्या कामांमुळे शिवारात चांगले पाणी जिरले आहे. त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिकांना आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
-प्रदीप सूर्यवंशी, नागरिक