कार्तिकी एकादशीनिमित्त दर्शनासाठी मंदिरांत गर्दी
By Admin | Published: November 4, 2014 12:40 AM2014-11-04T00:40:55+5:302014-11-04T00:42:51+5:30
कार्तिकी एकादशीनिमित्त दर्शनासाठी मंदिरांत गर्दी
नाशिक : भाळी बुक्का आणि हरिनामाचा गजर करत भाविकांनी आज कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर, काळाराम मंदिर यांसह शहरातील विविध मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती.
वारकऱ्यांमध्ये आषाढीनंतर प्रमुख मान असलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिवसभर चित्र होते़ प्रामुख्याने कॉलेजरोडवरील विठ्ठल मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ सकाळी विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली़ विविध भजनी मंडळांच्या वतीने भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ कार्तिकी एकादशीनिमित्त राम मंदिरालाही विद्युत रोषणाई करण्यात आली होती़ विठ्ठल मंदिरांसह दिवसभर राम मंदिरांतही दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती़ रात्री राम मंदिरात झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा व भजनाचा भाविकांनी लाभ घेतला़ सुंदरनारायण मंदिर येथेही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती़ या ठिकाणी सुरू असलेल्या हरिहर भेट महोत्सव व कार्तिकी एकादशीनिमित्त साई भजनावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ यासह गोरेराम लेन विठ्ठल मंदिर, पूर्व दरवाजा विठ्ठल मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर, कृष्ण मंदिर, बालाजी मंदिर अशा विविध मंदिरांमध्येही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती़ उपनगरांतील काही मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, प्रवचन, कीर्तन व दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)