रोजीरोटीअभावी जनता उपाशी, कारभारी भिडले मिसळपावशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:52+5:302021-05-22T04:14:52+5:30
नाशिक : शहरात कडक लॉकडाऊनमध्येही नागरिक खुलेआम फिरत असून, पोलिसांकडून वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे. बारा दिवसांसाठी ...
नाशिक : शहरात कडक लॉकडाऊनमध्येही नागरिक खुलेआम फिरत असून, पोलिसांकडून वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे. बारा दिवसांसाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने येत्या काही दिवसात शिथिल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शुक्रवारी अचानक पोलीस आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना शहरातील कडक (?) लॉकडाऊनची आठवण होऊन त्यांनी गर्दीवर नियंत्रण कसे मिळवावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस मित्रांची चौकसभा घेतली. विशेष म्हणजे या चौकसभेच्या निमित्ताने भररस्त्यात मंडप टाकून झणझणीत ‘मिसळ पाव’चा आस्वादही उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतल्याने शहरात लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील वस्तू मिळत नसल्याने कासावीस होणाºया समस्त नाशिककरांचा जीव हळहळला.
नाशिक शहरात कोरोना रूग्णांची गेल्या महिन्यात वाढलेली संख्या चिंताजनक असल्याने शासनस्तरावरून दखल घेत काही दिवसांसाठी शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्याचा निर्णय बुधवार (दि.१२) रोजी घेण्यात आला. त्यात जीवनावश्यक वस्तु वगळता सर्वच व्यवहार, व्यवसाय बंद ठेवण्यात आले. अगदी किराणा दुकाने व भाजीपाला विक्रीही बंद केल्यामुळे जनसामान्यांचे थोडे हालही झाले. मात्र दोन,चार दिवसातच नागरिक रस्त्यावर उतरू लागले असून, विनाकारण फिरणाºयांची संख्याही वाढली आहे. परंतु कडक लॉकडाऊनमुळे कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचा दिलासाही मिळाला आहे. शासनाने जारी केलेले लॉकडाऊनची मुदत येत्या रविवारी (दि.२३) संपुष्टात येत असताना शुक्रवारी पोलीस आयुक्तालयाने शहरातील सांगली बॅँक कॉर्नर( महात्मा गांधी रोड) येथे पोलीस मित्रांसाठी मार्गदर्शनार्थ चौकसभा घेतली. लॉकडाऊनचे पालन कसे करावे, रस्त्यावर गर्दी कशी होणार नाही याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खुद्द पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षकांनी हजेरी लावली. तास, दीड तासाच्या या चौकसभेनंतर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मंडपातच उपस्थितांनी झणझणीत‘मिसळ-पाव’चा आस्वाद घेतला. लॉकडाऊन जारी करून दहा दिवसांनी का होईना प्रशासनातील अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांना मार्गदर्शन करण्याची उपरती सुचली याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
चौकट==
निव्वळ योगायोग की?
पोलीस यंत्रणेने पोलीस मित्रांच्या मार्गदर्शनाच्या निमित्ताने शुक्रवारच्या दिवशी घेतलेली चौकसभा व मिसळ पावचे आयोजन पाहता, प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा शुक्रवारी वाढदिवस असल्यानेच हा सारा खटाटोप केल्याची शहरात उलटसुलट चर्चा होत असून, या चर्चेला दुजोरा मिळू शकला नसला तरी, हा योगायोग होता काय असा सवालही केला जात आहे.