पाऊस नसल्याने जिल्ह्यातील एस. टी. बसचा मार्ग सुरळीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:17+5:302021-09-09T04:19:17+5:30
नाशिक : गाव खेड्यापर्यंत पोहोचलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेसचा मार्ग यंदा पावसाळ्यातही सुरळीत सुरू आहे. अनेकदा ...
नाशिक : गाव खेड्यापर्यंत पोहोचलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेसचा मार्ग यंदा पावसाळ्यातही सुरळीत सुरू आहे. अनेकदा पुलावरून वाहणारे पाणी, भराव वाहून गेल्याने खचलेला रस्ता तसेच गावांचा तुटलेला संपर्क यामुळे बसेसचा मार्ग बंद होतो. परंतु यंदा जिल्ह्यात सप्टेबरमध्येही पाऊस नसल्याने गावापर्यंत बसेस पोहोचत असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे. तसेही यंदा पूर्ण क्षमतेने आणि गावखेड्यापर्यंत बसेस सुरू नसल्याने तालुक्याच्या गावापर्यंत बसेस सुरळीत पोहोचत आहेत.
जिल्ह्यात सध्या ५४६ बसेस सुरू असून, यामध्ये वाढदेखील होत आहे. जिल्ह्यातील १३ आगारांमधून बसेसचे नियोजन केले जात आहे. तालुका पातळीपर्यंत सुरू असलेल्या बसेस विनाअडथळा सुरू असल्याचे नाशिक विभागीय महामंडळाच्या वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात शक्यतो निफाड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटतो. तसेच येथील पुलावरून अवजड वाहतूक बंद केली जाते. तेव्हा प्रवासी वाहतूक थांबविली जाते किंवा इतर कोणत्याही रस्ते अथवा पुलावरून वाहतूक बंद होते तेव्हाच एस. टी. बसेस थांबतात. यंदा तशी परिस्थिती उद्भवलेली नाही.
--इन्फो--
जिल्ह्यातील आगार आणि सुरू असलेल्या बसेसची संख्या
नाशिक-१: ९४
नाशिक-२: ४२
मालेगाव: ४२
मनमाड: ३३
सटाणा: ५३
सिन्नर: ४७
नांदगाव: ३५
इगतपुरी: २७
लासलगाव: ३४
कळवण: ४७
पेठ: २७
येवला: ३३
पिंपळगाव: ३२
--इन्फो--
लांब पल्ल्याच्या बसेस सुरळीत सुरू
राज्यातील अनेक भागात पाऊस असल्याने काही भागातील बसेस थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे अडकून पडलेल्या बसेस पोहोचू शकलेल्या नाहीत. मागील महिन्यात रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. आता बसेस सुरळीत सुरू झालेल्या आहेत. जिल्हांतर्गत बसेस नियमतपणे धावत आहेत.
--इन्फो--
पावसामुळे फेऱ्या रद्द करण्याची आली वेळ
नांदगावमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथून सुटणाऱ्या गाड्या सकाळच्या सुमारास सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाशिकला होणाऱ्या फेऱ्या बंद करण्याची वेळ आली. याशिवाय आगारातही पाणी साठल्याने अनेक बसेस थांबवाव्या लागल्या. जातेगाव, साकोरे मार्गावरील फरशी पूल तसेच भराव वाहून गेल्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली. इतर ठिकाणी मात्र बसेस सुरळीत सुरू करण्यात आल्या. दुपारनंतर नांदगाव तसेच मालेगाव आगारातून बसेस नियमित सुरू करण्यात आल्या.