मनपाच्या अहवालाअभावी रखडले गावठाण क्लस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:25 AM2019-06-03T00:25:46+5:302019-06-03T00:26:11+5:30
शहरातील गावठाणांचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी महापालिकेकडून वाढीव चटई क्षेत्र दिल्यास होणाऱ्या आघातांचा, परिणामांचा अहवाल सादर करण्यास गेल्या वर्षी सांगितले होते.
नाशिक : शहरातील गावठाणांचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी महापालिकेकडून वाढीव चटई क्षेत्र दिल्यास होणाऱ्या आघातांचा, परिणामांचा अहवाल सादर करण्यास गेल्या वर्षी सांगितले होते. मात्र वर्ष सरले तरी असा कोणताही अहवाल अद्याप तयारच झालेला नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात जुन्या नाशिकमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर या विषयाने उचल खाल्ली होती, परंतु आता या पावसाळ्याच्या तोंडावरच चर्चा सुरू झाली असून, नगररचना विभागाने महासभेत विषय मांडला आहे.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी जुन्या नाशिकमध्ये वाडा कोसळून दोन जण ठार झाल्यानंतर प्रशासनाने निविदा मागवल्या, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा कोणतीच कार्यवाही केलेली नाही. आता महासभेवर सल्लागार संस्था नियुक्त करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आल्याने उदासीनतेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेत २३ खेडी गाव समाविष्ट असून, गावठाण किंवा गाभा क्षेत्र सर्वच ठिकाणी आहेत. दाट वस्तीसाठीचे नियमदेखील वेगळे आहेत. अरुंद रस्ते, उंच सखल भागामुळे पाणी, गटारींच्या असुविधा अशा अनेक अडचणींमुळे त्यांचा पुनर्विकास करताना जादा चटई क्षेत्र देण्याची मागणी होत आहे. मात्र, केवळ ज्यादा चटई क्षेत्र देऊन हा विषय सुटणार नाही तर क्लस्टर म्हणजेच समुच्चय विकास करण्यासाठी राज्य शासनाने नियोजन केले आहे. तथापि, गावठाणासारख्या दाट वस्तीच्या भागात चटई क्षेत्र वाढवून दिले तर त्याचे अनुकूल किंवा प्रतिकूल कोणते परिणाम होऊ शकतील याबाबत आघात मूल्यमापन अहवाल (इंपॅक्ट असेसमेंट रिपोर्ट) देण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवल्या, त्यावर चार ते पाच संस्थांनी सुरुवातीला स्वारस्य दाखवले नंतर ते मात्र कोणीच उत्सुकता दर्शविली नाही. महापालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांच्या शह- काटशहाच्या खेळीत गावठाण भागातील जिव्हाळ्याच्या विषयाकडे लक्षच दिले गेले नाही आणि आता येत्या महासभेवर यासंदर्भातील प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय टाळला जात असताना लोकप्रतिनिधीदेखील मौन बाळगून आहेत. त्यामुळे आता पुन्हा पावसाळ्यात संकटाला तोंड द्यायचे काय? असा प्रश्न जुन्या नाशकातील नागरिकांना पडला आहे.
सिंगापूर नाही की क्लस्टर नाही
महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट लागू झाल्यानंतर सर्वप्रथम गावठाणाचे सिंगापूर करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे काहीच झाले नाही. माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी चटई क्षेत्र वाढवून देण्यासाठी घोषणा केली होती. मात्र त्याचा पाठपुरावा झाला नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा गावठाण विकास झालेला नाही.