रोपांअभावी कांदा लागवडी खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 04:51 PM2020-08-13T16:51:39+5:302020-08-13T16:52:10+5:30
जळगाव नेऊर : परिसरात रोपांअभावी कांदा लागवडी खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात कांदा लागवडीच्या प्रमाणात घट होईल असे चित्र निर्माण झाले आहे.
मागील वर्षी लाल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी लाल कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात क्षेत्र राखीव ठेवले, परंतु महिनाभरापासून उष्ण, दमट वातावरण तर कधी मुसळधार पाऊस यामुळे लाल कांदा रोपे झोडपल्याने रोपावर बुरशीजन्य रोग आला तर काही ठिकाणी कांदा रोपे जमिनीतच सडली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत रोपच शिल्लक न राहिल्याने नांगर घातला तर काही शेतक-यांनी त्याच जमिनीत पुन्हा बियाण्यांची पेरणी केली. आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवड होत असतात पण यावर्षी मात्र शेतक-यांना रोपांअभावी कांदा लागवडीसाठी खोळंबा होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनी पडीक राहणार असल्याचे सध्या येवला तालुक्यात दिसत असुन कांदा लागवडीत घट होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अनेक शेतकरी कांदा लागवडीसाठी प्रथम पसंती देतात ती घरीच बिजोत्पादन केलेल्या कांदा बियाण्याला. यावर्षी मात्र पेरणी केलेले घरगुती बियाणे पावसाने व बुरशीजन्य रोगांमुळे नष्ट झाल्याने शेतक-यांनी पंधरा हजार रु पये पायली दराने बियाणे खरेदी केली पण आता घरगुती बियाणे संपुष्टात आल्याने शेतक-यांवर पर्यायी परंतु महागडे बियाणे बाजारातून खरेदी करण्याची वेळ आली आहे.