जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने पांडवनगरी परिसरात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:26 AM2018-06-18T00:26:05+5:302018-06-18T00:26:05+5:30
पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
इंदिरानगर : पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पांडवनगरी ते कलानगरदरम्यान असलेल्या विविध कॉलनी आणि सोसायट्यांना सुमारे बारा वर्षांपासून अत्यंत कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नेहमीच कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. त्याची दखल घेऊन सुमारे दोन वर्षांपासून पांडवनगरी परिसरात नव्याने जलकुंभाचे बांधकाम सुरू होते. अखेर नवीन जलकुंभाचे बांधकाम पुन्हा झाल्यानंतर सुमारे एक महिन्यापूर्वी सदर जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस पांडवनगरी ते कलानगर दरम्यान पाणीपुरवठा काही दिवस सुरळीत झाला. परंतु पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली कारण नवीन जलकुंभ असून, तो जलसाठ्याने भरला जात नसल्याने पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जेमतेम पिण्याचे पाणी सुद्धा होत नाही, तर वापरायचे काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो रु पये खर्च करून नवीन बांधण्यात आलेला जलकुंभ जलसाठीने भरत नसल्याने मनपा आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून पाणीपुरठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे .
आंदोलनानंतरही पाणीपुरवठा सुरळीत नाही
प्रभाग क्र मांक ३०च्या नगरसेवकांनी सुमारे दीडशे महिलांसमवेत बोंबाबोंब आंदोलन केले होते. तसेच प्रभाग सभेतही अनेक वेळा प्रशासनास धारेवर धरले तरीही पाणीपुरवठा सुरळीत होईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवदुर्गा मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष योगेश दिवे, पोपट डावरे, लक्ष्मण गोरे, संजय लोखंडे, कल्पना साळवे, विमल गावंडे यांसह परिसरातील नागरिक आयुक्तांना निवेदन देणार आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पाणीटंचाई आहे. पाटील गार्डन, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, कमोदनगर, शास्त्रीनगर, जिल्हा परिषद कॉलनी, देवेंद्र सोसायटी यांसह इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.