सिडकोतील देवराई प्रकल्पाला घरघर ; पाण्याअभावी झाडांची रोपे वाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:53 PM2020-06-14T18:53:56+5:302020-06-14T18:57:14+5:30
महापालिकेच्यावतीने देवराई प्रकल्पांतर्गत सिडको भागातील कर्मयोगीनगर भागात गेल्या वर्षभरापूर्वी वृक्षारोपण केले होते. परंतु आज मीतिला या देवराई प्रकल्पाच्या परिसरात संपूर्ण कचऱ्याचे ढीग साचलले असून पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने अनेक झाडांना फटका बसला आहे.
नाशिक : पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी महापालिकेच्यावतीने सिनेअभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते देवराई प्रकल्पांतर्गत येथील सिडको भागातील कर्मयोगीनगर भागात गेल्या वर्षभरापूर्वी वृक्षारोपण केले होते. परंतु आज मीतिला या देवराई प्रकल्पाच्या परिसरात संपूर्ण कचऱ्याचे ढीग साचलले असून पाणीपुरवठ्यायी सोय नसल्याने अनेक झाडांना फटका बसला आहे. येथील अनेक झाडे पाण्याअभावी वाळून गेली असून याबाबत प्रभाग नगरसेवकांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही दखल घेतली जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मध्ये गेल्यावर्षी सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते देवराई प्रकल्पांतर्गत कर्मयोगीनगर भागातील महापालिकेच्या उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने याठिकाणी पाणीपुरवठा व साफसफाईसाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही. संबधित अधिकारी शिवाजी आमले यांना वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्याची गरज निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी यांसदर्भात दखल घेतली नसल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक कल्पना पांडे यांनी केला आहे. महापालिकेने याठिकाणी पाणीपुरवठा पाईप लाईन टाकली असून पाण्याची टाकीही अनेक दिवसांपासून उद्यानात पडून आहे. परंतु केवळ पाणीपुरवठा पाईप लाईन कनेक्शन पाण्याच्या टाकीत जोडले नसल्याने झाडांना पुरेसे पाणी मिळत नाही. दरम्यान, महापालिकेच्या उद्यान विभागाच्या उदासिनतेमुळे या देवराई प्रकल्पाला घरघर लागली असून या भागातील प्रवीण पाटील, शोभा ढोमसे, मंगल वराडे,अशोक सुराणा रवींद्र्र गीते,अनिल बोंबे, राजू चव्हाण,उषा गोसावी,रवींद्र कुलकर्णी,नितीन ठोके, जगन पाटील यांनीही महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत या उद्यानात पाणीपुरवठा सोय करण्यासाठी मागणी केली होती. परंतु, महापालिका अधिकाऱ्यांनी याकडे लक्षच दिले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
उद्यानाला बकाल स्वरुप
देवराई प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण कचरा व पालापाचोळा जास्त झाला आहे. महापालिकेने थाटामाटात देवराई प्रकल्प अंतर्गत उद्यानात वृक्षरोपण केले असले तरी या संपूर्ण उद्यानाला देखभाली अभावी बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.