भंगार उचलताना पालिकेची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:40 AM2017-10-13T00:40:34+5:302017-10-13T00:41:20+5:30
नऊ महिन्यांपूर्वी कारवाई करूनही सातपूर-अंबड लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारविरोधी महापालिकेने गुरुवारी (दि.१२) मोहीम सुरू केली. या मोहिमेत माल जप्त करण्याची प्रक्रिया राबविल्याने भंगार उचलताना महापालिकेची दमछाक झाली.
सिडको/सातपूर : नऊ महिन्यांपूर्वी कारवाई करूनही सातपूर-अंबड लिंकरोडवर पुन्हा वसलेल्या भंगार बाजारविरोधी महापालिकेने गुरुवारी (दि.१२) मोहीम सुरू केली. या मोहिमेत माल जप्त करण्याची प्रक्रिया राबविल्याने भंगार उचलताना महापालिकेची दमछाक झाली. दिवसभरात १६९ ट्रकमाल जप्त करून तो सातपूर क्लब हाउसजवळील मैदानात नेऊन टाकण्यात आला. दरम्यान, मोहिमेप्रसंगी काही व्यावसायिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांपुढे त्यांची मात्रा चालली नाही. शुक्रवारीही सदर मोहीम पुढे सुरूच राहणार आहे.
महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये भंगार बाजार विरोधी ऐतिहासिक मोहीम राबविली होती. त्यावेळी सुमारे ७५०हून अधिक व्यावसायिकांच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात आला होता. दरम्यान, भंगार बाजार व्यावसायिकांनी पुन्हा एकदा हळूहळू हातपाय पसरत अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याने महापालिकेने संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत स्क्रॅप मर्चंट असोसिएशनने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु, न्यायालयानेही व्यावसायिकांची याचिका फेटाळून लावत त्यांना कायद्याचा गैरवापर केल्याप्रकरणी दहा हजारांचा दंड ठोठावला. तत्पूर्वी, महापालिकेने पोलीस बंदोबस्त प्राप्त होताच गुरुवार (दि.१२) पासून पुन्हा भंगार बाजार हटाव मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार, गुरुवारी सकाळी १० वाजेपासून कारवाईस सुरुवात करण्यात आली. एस्सार पेट्रोल पंपापासून कारवाई सुरू होऊन ती सायंकाळी संजयनगरपर्यंत चालली. महापालिकेने कारवाईसाठी सहा पथके तयार केली होती. त्यात प्रत्येक पथकात तीन जेसीबी, दोन क्रेन, सहा डम्पर यांची व्यवस्था करण्यात आली होती. भंगार बाजार व्यावसायिकांनी उभारलेले तात्पुरते शेड यावेळी हटविण्यात आले. परंतु, बºयाच व्यावसायिकांनी आपल्या जागांवर मोठ्या प्रमाणावर माल आणून ठेवल्याने तो उचलताना महापालिकेच्या पथकाची दमछाक झाली.