शिक्षण मंडळाचा खो खो संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:05 AM2018-11-14T01:05:37+5:302018-11-14T01:05:57+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीपदाचा खो खो अखेर संपुष्टात आला असून, प्रशासनाधिकारीपदी उदय देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी देवरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यासदेखील नकार दिला होता.
नाशिक : महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीपदाचा खो खो अखेर संपुष्टात आला असून, प्रशासनाधिकारीपदी उदय देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी देवरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यासदेखील नकार दिला होता. मात्र शिक्षण आयुक्तांनी महापालिकेला पत्र पाठवून प्रशासनाधिकारीपद हे वर्ग दोनचे असल्याने देवरे यांचीच नियुक्ती कायम केली आहे.
महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांची महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळाचे सचिव म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे.त्यांच्याकडील कार्यभार हा नवीन अधिकाऱ्याकडे सोपवूनच त्यांना कार्यमुक्त करण्याची महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची योजना होती. मात्र शिक्षण आयुक्तांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नितीन बच्छाव यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश दिले त्यानुसार त्यांच्याकडे कार्यभार देऊन उपासनी महापालिकेतून कार्यमुक्त झाले. दरम्यान, बच्छाव यांच्याकडे कामाचा ताण असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी पत्रही आणले होते, मात्र आयुक्तांनी ते नाकारले होते. उपासनी हे वर्ग एकचे अधिकारी असल्याने याच दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा असे पत्र महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिक्षण आयुक्तांना पाठविले होते. त्यावर शिक्षण आयुक्तांनी उपासनी यांच्या पुरताच हा दर्जा उन्नत होता असे स्पष्ट करीत शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारीपद हे वर्ग दोनचे असल्याने देवरे यांची नियुक्ती करीत असल्याचे आदेश दिले. महापालिकेने ते स्विकृत करून त्यानुसार देवरे यांना रूजु करून घेतले.