मक्यावरील लष्करी अळीमुळे देवळा तालुक्यात सोयाबीनला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:48+5:302021-07-24T04:10:48+5:30
देवळा (संजय देवरे) : तालुक्यात यंदाच्या वर्षी आतापर्यंत २६,५३९ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यापैकी जून ...
देवळा (संजय देवरे) : तालुक्यात यंदाच्या वर्षी आतापर्यंत २६,५३९ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यापैकी जून महिन्याच्या उत्तरार्धात तालुक्यातील काही गावांमध्ये पडलेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. नंतर मात्र, पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुबार पेरणीचे संकट या शेतकऱ्यांपुढे उभे राहिले होते, परंतु मागील आठवड्यात आलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट दूर झाले व पिकांना जीवदान मिळाले असून, उर्वरित शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात खरीप पिकांची पेरणी केली आहे.
तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक मक्याची पेरणी केली जाते. त्या खालोखाल बाजरी, मूग, भुईमूग, सोयाबीन, तूर आदी पिके घेतली जातात. खरीप हंगामात मका हे पशुधनासाठी चारा देणारे व शाश्वत आर्थिक उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून देवळा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात येत असे. मका पिकाच्या उत्पन्नावरच रब्बी हंगामातील कांदा पीक लागवडीसाठी शेतकरी आर्थिक नियोजन करत, परंतु तीन वर्षांपासून मका पिकावर तालुक्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मका संकटात सापडला आहे. एक ते दीड महिन्यापूर्वी पेरणी केलेल्या मका पिकावरील या लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्याचा मका लागवडीवर परिणाम झाला असून, मका पिकाचे क्षेत्र घटले आहे. मक्याऐवजी शेतकरी बाजरी, तूर व सोयाबीनला अधिक पसंती देऊ लागले आहेत. गतवर्षी तालुक्यात ११० हेक्टर क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली होते. चालू वर्षी त्यात वाढ होऊन १६२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.
-------------------
मका बियाणांच्या मागणीत घट
पावसाला उशीर झाल्यामुळे उशिराने मका पेरणी केल्यास उन्हाळ्यात पाण्याअभावी रब्बी हंगाम पदरात पडणे कठीण होते. मका पेरणी केल्यास जमिनीचा पोत उतरतो. यामुळे मक्यापेक्षा लवकर येणाऱ्या बाजरी व सोयाबीनला शेतकरी प्राधान्य देताना दिसत आहेत. बियाणे विक्रेत्यांकडे मका बियाण्याची मागणी गतवर्षापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती देवळा येथील एका बी-बियाणे विक्रेत्याने दिली.
-------------------------
शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
शेतकऱ्यांनी मका पिकावर विविध कीटकनाशकांची फवारणी सुरू केल, परंतु लष्करी अळीचा नायनाट होईल का? याबाबत मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारण आतापर्यंत कृषी विभागाने शिफारस केलेल्या विविध कीटकनाशकांच्या फवारण्या करूनही रोग आटोक्यात येत नसल्याचा शेतकऱ्यांना अनुभव येत आहे.
अमेरिकन लष्करी अळीचा भारतात सर्वप्रथम कर्नाटक राज्यात मका पिकावर प्रादुर्भाव दिसून आला होता. मका पिकावर प्रामुख्याने पडणारी ही अळी इतर पिकांनाही लक्ष करते. या अळीमुळे मका पिकाचे सर्वाधिक नुकसान होते, मका पिकाची पूर्ण वाढ होईपर्यंतच्या सर्व अवस्थेत लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मका उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे पुढे चाराटंचाईला तोंड द्यावे लागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.
----------------------
मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, त्याचा मका लागवडीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचा सोयाबीन व बाजरी पेरण्याकडे कल दिसून येत आहे. लष्करी अळीचे निर्मूलन करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी विभागामार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध उपाययोजनांबाबत माहिती देऊन जनजागृती केली जात आहे. दोन हजार माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरावरून औषधपुरवठा केला जाणार असून, ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना ही औषधे वाटप केली जातील.
- सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी, देवळा
--------------------
जुलै, २०२१ अखेर खरीप पिकांची पेरणी झालेले क्षेत्र-
मका -१६,४७९ हेक्टर,
बाजरी - ७,९५६ हेक्टर,
तूर - २७० हेक्टर,
मूग - ८७६ हेक्टर,
भुईमूग - ७२४ हेक्टर.
सोयाबीन - १६२ हेक्टर
--------------------
(२३ देवळा १/२)
230721\23nsk_6_23072021_13.jpg
२३ देवळा १/२