‘नकोशी’ झाल्याने मातेने टाकून काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:23+5:302021-02-07T04:14:23+5:30
शनिवारी सकाळी फाशीचा डोंगर परिसरात रवींद्र रामचंद्र पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. फिरत असताना ...
शनिवारी सकाळी फाशीचा डोंगर परिसरात रवींद्र रामचंद्र पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. फिरत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता एका प्लॉस्टिकच्या गोणीमध्ये बाळाला कपड्यात गुंडाळून ठेवले होते. पवार यांनी तत्काळ आपल्या मित्रांना फोन करून बाळास श्रमिकनगरमधील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. डॉक्टरांनी बाळास तपासून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बाळाचे वजन दोन किलो ७०० ग्रॅम आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, भाजपा युवा मोर्चाचे अमोल पाटील, दिलीप पाटील यांनी घटनेची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी मुलीचे शंकुतला असे नाव ठेवले आहे. सदर मुलीला दत्तक घेऊन सांभाळ करण्याची इच्छा गंगासागरनगर परिसरात राहणाऱ्या भाग्यश्री विलास तकाटे व विलास तकाटे यांनी दर्शवली आहे. मुलीला टाकून जाणाऱ्या अज्ञात मातेविरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल पुढील तपास करीत आहेत.