कठडे नसल्याने गैरसोयसिन्नर-शिर्डी रस्त्यावरील पूल धोकेदायक
By admin | Published: August 7, 2016 09:58 PM2016-08-07T21:58:52+5:302016-08-07T22:00:03+5:30
साईभक्तांंचा संतप्त सवाल : नदीपात्रात वाहने पडल्यानंतर कठडे बसवणार का?
शैलेश कर्पे ल्ल सिन्नर
जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबईसह उपनगरातून दररोज हजारो वाहने शिर्डीला जात असतात. सदर वाहने ज्या रस्त्याने जातात त्या सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील खोपडी शिवारातील देवनदीचा पूल तुटलेल्या कठड्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक बनला आहे. देवनदी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. मात्र पुलाचे कठडे दुरुस्त करण्याकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील खोपडी शिवारात आम्रपाली हॉटेलजवळ देवनदीत वाहने पडल्यानंतर कठडे दुरुस्त केले जाणार का असा संतप्त सवाल या मार्गाने प्रवास करणारे साईभक्त विचारत आहेत. देवनदीला पूर असल्याने सदर पुलावरून मार्गक्रमण करताना पुलाचे तुटलेले कठडे पाहून हृदयात धस्स झाल्याशिवाय राहात नाही.
महाड येथील दुर्दैवी दुर्घटनेमुळे प्रत्येक वाहनचालक व प्रवासी कोणत्याही नदीवरील पुलावरून जाताना त्याकडे बारकाईने पाहणे साहजिक आहे. त्यात नदीला पूर असेल तर प्रवासी वाहनचालकाला वाहन सावकाश चालविण्याचा सल्ला हमखास देतात.
अशा परिस्थितीत देवनदीच्या पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत ठेवणे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना न परवडणारी बाब आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून देवनदी दुथडी भरुन वाहत असतांना या तुटलेल्या कठड्यांकडे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व्हावे ही न पटण्याजोगी बाब आहे.