संततधारेमुळे टाकेदला भातलागवडीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 07:02 PM2019-07-26T19:02:34+5:302019-07-26T19:02:58+5:30
सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे भातलागवडीची लगबग सुरू झाली आहे. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून टाकेद परिसरात संततधार सुरू झाली आहे.
सर्वतीर्थ टाकेद : तालुक्यात सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे भातलागवडीची लगबग सुरू झाली आहे. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर तीन दिवसांपासून टाकेद परिसरात संततधार सुरू झाली आहे.
सध्या दुबार पेरणी केलेले व सुरुवातीला भात टाकून रोपे तरारून वर आलेली भातरोपे दोन्ही पद्धतीमुळे सर्वत्र भाताची आवणी सुरू आहे. कुणी पारंपरिक पद्धतीने तर कुणी जपानी पद्धतीने आवणी करीत आहे. पावसामुळे सर्वत्रच लगबग सुरू असल्याने मजुरांची वानवा जाणवत आहे.
आवणी साठी पुरुष व स्रियांना दोनशे पन्नास रुपये कोरडा रोज दिला जात आहे. अनेक ठिकाणी शेतीमालक स्वखर्चाने मजुरांना घेऊन येतात. वाहनाने परत पोहोच सुद्धा करतात. पूर्वी सकाळी नऊ ते सहा ही वेळ असायची. आता साडेदहा अकराच्या दरम्यान मजूर शेतात जातो व पाच वाजले की लगेच शेतातून बाहेर पाय काढला जातो. आता बहुसंख्य ठिकाणी बैलांऐवजी ट्रॅक्टरनेच शेतीची मशागत केली जात आहे.
धामणगाव, अधरवड, आंबेवाडी, खडकेद या पट्ट्यात आवणी सुरू आहे, तर दोन ते तीन दिवसांपासून टाकेद पट्ट्यात भातलागवडीस सुरुवात झाली आहे. मायदरा, धानोशी, अधरवड, अडसरे, टाकेद या भागात भाताच्या आवणीस सुरुवात झाली आहे.
जोरदार पावसापेक्षा संततधार सुरू असल्याने हे पाणी शेतात
मुरते (जिरते) व विहिरींना
पाणी येण्यास सुरुवात होत असते. टाकेद भाग उताराचा व मुरूमयुक्त जमीन असल्याने जोरदार
पावसाने पाणी लगेच वाहून जाते म्हणून संततधार पावसाची अपेक्षा आहे.