ओखी वादळाच्या सावटामुळे नाशिकच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली, पालकांनी सुरक्षिततेसाठी घेतली खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 08:45 PM2017-12-05T20:45:52+5:302017-12-05T21:00:52+5:30
वादळाच्या प्रभावामुळे पाटेपासूनच सुरु झालेला रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावणासोबतच थंडीचा प्रचंड कडाका जाणवत असल्याने अनेक पालकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरीच ठेवून घेतले.
नाशिक : कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहर व परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये घट दिसून आली. वादळाच्या प्रभावामुळे पाटेपासूनच सुरु झालेला रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावणासोबतच थंडीचा प्रचंड कडाका जाणवत असल्याने अनेक पालकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरीच ठेवून घेतले. त्यामुळे शहरातील बहूतांश शाळांमध्ये 15 ते 20 टक्के विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे दिसून आले.
ओखी वादळाच्या प्रभावामुळे शहरातील वातावरणात अचानक झालेला बदल आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबई महानगरातील शाळांना जाहीर केलेली सुट्टी या मुळे नाशिकमधील शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या हजेरीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. तावडे यांनी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली असली तरी हा संदेश सोशल मिडियातून वायरल झाल्यामुळे नाशिकच्याकाही पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळच्या सुमारास आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांची संख्याही कमी होती. तर अनेक दांडी बहाद्दर विद्यार्थ्यांनी ढगाळ वातावरणाचा फायदा घेत शाळेला दांडी मारली. सकाळच्या सुमारास सुरु असलेला रिमझीम पाऊस आणि थंड हवेमुळे जाणवणारा गारठा यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळेची तयारी करून घरीच राहणे पसंत केले. तर काही विद्यार्थ्यांनी चक्क शाळेच पोहोचल्यानंतरही पुन्हा घर गाठले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान, ओखी वादळाच्या प्रभावामुळे दिवसभर शहरात रिमझिम पावसासह ढगाळ वातावरण व थंडीचे जाणवत असल्याने शहरातील बहूतांश शाळांनी खेळाच्या तासिका रद्द केल्या होत्या. त्यामुळे शाळांच्या आवारातही मुलांची उपस्थिती घटल्याचे दिसून येत होते.