पोलिसांअभावी खेडगाव येथे मृतदेह पाच तास पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:59 AM2019-04-27T00:59:08+5:302019-04-27T00:59:39+5:30
लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा अडकल्याने अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल पाच तास रस्त्यावर पडून राहिल्याची संतापजनक घटना घडली.
खेडगाव/वणी : लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा अडकल्याने अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल पाच तास रस्त्यावर पडून राहिल्याची संतापजनक घटना घडली.
शुक्र वार दिनांक २६ रोजी दुपारी खेडगाव वडनेर रस्त्यावरील आवारे वस्तीजवळ एका पादचाऱ्याला खेडगाव कडून वडाळीभोई कडे जाणाºया ट्रकने चिरडले. या अपघातात तो जागीच गतप्राण झाला. ही घटना तेथील शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळविली तसेच पळून जाणाºया ट्रक चालकास ट्रकसह पकडून ठेवले. खेडगाव येथील दोन कर्मचारी सिन्नर येथे बंदोबस्तासाठी गेले होते तर पोलीस हवालदार खताळ यांना वणी पोलीस स्टेशनला ड्युटी असल्यामुळे पंचनामा करायला पोलीस यंत्रणा उपलब्ध न झाल्याने तब्बल पाच तास मृतदेह रस्त्यावरच पडून होता. पाच वाजेच्या सुमारास हवालदार खताळ हे घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी आरोग्य केंद्रात पाठविला. मृताच्या खिशात असलेल्या आधारकार्डावरून सदर गृहस्थ जळगाव जिल्ह्यातील असून त्याचे नाव भीमा रामा वंजारी आहे. त्यांचे वय सुमारे ६५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी चालकासह तो ट्रक पोलीस स्टेशनला नेला.