रेल्वे व्हील कारखान्यामुळे नाशिकच्या उद्योगाला मिळेल गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:58 AM2019-01-18T01:58:01+5:302019-01-18T01:58:44+5:30
नाशिकमध्ये सुरू होत असलेल्या रेल्वे व्हील कारखान्यामुळे रेल्वेबरोबरच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रालादेखील चालना मिळेल, महाराष्टÑासाठी रेल्वेकडून मिळालेल्या निधीचादेखील विकासाला हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गिते यांनी केले.
नाशिकरोड : नाशिकमध्ये सुरू होत असलेल्या रेल्वे व्हील कारखान्यामुळे रेल्वेबरोबरच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रालादेखील चालना मिळेल, महाराष्टÑासाठी रेल्वेकडून मिळालेल्या निधीचादेखील विकासाला हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गिते यांनी केले.
एकलहरारोड येथील रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखाना विस्तारीकरण अंतर्गत रेल्वे व्हील निर्मिती व रिपेअरिंग कारखान्याचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या हस्ते व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याप्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना गिते म्हणाले की, तत्कालीन दिवंगत रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी १९८१ मध्ये रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याची स्थापना केली. याकरिता २५० एकर जागा शेतकऱ्याकडून घेण्यात आली. मात्र दंडवतेनंतर ३२ वर्षे इतर राज्याचे रेल्वेमंत्री झाल्याने त्यांनी आपापल्या राज्यात रेल्वेचे प्रकल्प नेले. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व आताचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे महाराष्टÑातील असल्याने गेल्या चार वर्षात महाराष्टÑात रेल्वेच्या विकासाला मोठा निधी उपलब्ध झाल्याने चालना मिळाली असे यांनी स्पष्ट केले.
सर्वच रेल्वे इलेक्ट्रिकल होत असल्याने व्हील, सांगाडे आदी गोष्टी भविष्यात लागणार आहे. त्यामुळेच ५०० व्हील्स तयार व दुरुस्ती करणारा कारखाना येथे उभा राहत आहे. त्याकरिता ५२ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे गिते यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, पुढील काळात नाशिक, पुणे, नगर, औरंगाबाद हे इंडस्ट्रियल कॅरिडोर राहणार आहे.
यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, भाजपा ग्रामीण जिल्हाप्रमुख दादा जाधव, रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर, सचिन मराठे, महेश बडवे, अजय बोरस्ते, विलास शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत बाळापुरे, कामगार नेते जगदीश गोडसे यांनी केले. आभार मुख्य कारखाना प्रबंधक अनिलकुमार अग्रवाल यांनी मानले.