पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 05:50 PM2019-07-04T17:50:10+5:302019-07-04T17:50:33+5:30
सिन्नर : सुरुवातीला पावसाने सलामी दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. सिन्नर तालुक्यात जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या प्रारंभा पर्यंत केवळ ५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती.
यावर्षी लांबलेला पाऊस आणि लष्करी अळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मक्याच्या क्षेत्रात सुमारे २५ टक्क्यापर्यंत घट होणार आहे. तर अल्प पावसामुळे बाजरी आणि सोयाबिनच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात सरासरी ६२ हजार ८४० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणे अपेक्षीत आहे. त्यापैकी केवळ ३१४२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. देवपूर, वावी, शहा यासह पांढुर्ली मंडलातील काही भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे येथे खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. तर इतर मंडळात मात्र पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. जूनच्या संपूर्ण महिन्यात प्रत्येक मंडलात सरासरी ५ दिवस पाऊस पडला आहे. तेवढा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नाही. गेल्या वर्षभर मका पिकाला चांगला दर मिळाल्याने यंदा तालुक्यात मक्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा होती. शेतक-यांनीही तशी तयारी केली होती. मात्र पाऊस लांबल्याने मका पेरणी खोळंबली आहे. चार महिन्यांचे हे पीक असून दमदार पावसाचे आगमन लांबल्याने कांद्याच्या लागवडीसाठी रान मोकळं होण्यास उशीर होणार आहे.