पावसामुळे खालशांनी बस्तान गुंडाळले
By admin | Published: September 19, 2015 10:54 PM2015-09-19T22:54:53+5:302015-09-19T22:55:22+5:30
पावसामुळे खालशांनी बस्तान गुंडाळले
तिसऱ्या पर्वणीच्या दिवशी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे साधुग्राममधील खालशांनी शनिवारी बस्तान गुंडाळण्यास सुरवात केली. २५ सप्टेंबरपर्यंत बहुतांश खालशे थांबण्याच्या तयारीत होते. मात्र शुक्रवारी पाऊस सारखा बरसल्याने खालशातील साधू, भक्तांना रात्रभर जागून काढावी लागली. पाऊस सतत सुरू राहिल्यास मुक्कामासाठी हाल होणार म्हणून खालशांनी मंडपासह सामान आवरण्यास सुरुवात केली आहे. साधुग्राममध्ये प्रशासनाने तिन्ही अनी आखाड्यांत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चाऱ्याची व्यवस्था केली. मात्र खालशांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी चाऱ्या काढून कुठलीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नाही. महिनाभर पाऊस फारसा पडला नाही. त्यामुळे खालशांना अडचणी झाल्या नाहीत; परंतु दुसऱ्या पर्वणीच्या पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या पर्वणी काळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खालशांमध्ये पाणी साचले. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या पर्वणीला साधू व भक्तगणांना खालशांच्या मंडपात रात्रभर जागून राहावे लागले. खालशांच्या मंडपात पाणी साचल्याने मुक्कामाचा प्रश्न निर्माण झाल्याने साधूंसह भक्तगणांनी परतीला सुरुवात केली आहे.