पावसामुळे बेघरांनी घेतला भाजीमंडईचा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 07:21 PM2019-08-03T19:21:27+5:302019-08-03T19:22:11+5:30
पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक बेघर नागरिकांना दिवसभर पावसापासून बचावासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणा-या बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथे चूल मांडल्याने पावसाळा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा गोदावरीला शनिवारी पूर आल्याने नदीकाठ परिसरात झोपड्या व राहुट्या उभारून राहणाऱ्या नागरिकांच्या झोपड्या पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी काही दिवसांपासून ओस पडलेल्या मनपाच्या गणेशवाडी भाजीमंडईचा ताबा घेत तेथेच संसार थाटले.
पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक बेघर नागरिकांना दिवसभर पावसापासून बचावासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणा-या बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथे चूल मांडल्याने पावसाळा सुरू झाल्यापासून भाजीमंडई बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे. शनिवारी दुपारी गोदावरीला पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पूर येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत होते. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर नदीकाठच्या परिसरात झोपड्या, पाल उभारून राहणा-या बेघरांनी आपल्याजवळील कपड्यांची गाठोडी करत लहान मुलांना खांद्यावर उचलून घेत थेट मनपाच्या भाजीमंडईचा रस्ता धरला. पालिकेने मंडईत भाजीविक्रेत्यांसाठी उभारलेल्या ओट्यांवर बेघरांनी सहारा घेतला व भाजीमंडईला आपले घर म्हणून तेथे चूल पेटवून दाटीवाटीने संसार थाटले आहे. भाजीमंडई गेल्या काही वर्षांपासून भाजीविक्रेत्यांविना ओस पडलेली असल्याने गंगाघाटावरील अनेक बेघर नागरिक व कुटुंबीयांनी पावसाच्या निमित्ताने का होईना पुन्हा भाजीमंडईचा ताबा घेतल्याचे चित्र काही दिवसांपासून गोदावरी नदीला आलेल्या पुरानंतर दिसून येत आहे.