विल्होळीतील गुदामावर तहसीलदारांचा छापा रेशनिंगच्या धान्याचा संशय : गुदामातील २०० धान्यांच्या गोण्या सील करून टेम्पो जप्त
By admin | Published: December 10, 2014 01:50 AM2014-12-10T01:50:02+5:302014-12-10T01:50:35+5:30
विल्होळीतील गुदामावर तहसीलदारांचा छापा रेशनिंगच्या धान्याचा संशय : गुदामातील २०० धान्यांच्या गोण्या सील करून टेम्पो जप्त
नाशिक : विल्होळी शिवारातील देव अॅग्रो फुडच्या गुदामावर मंगळवारी सायंकाळी तहसीलदार व पोलिसांनी छापा टाकून धान्याच्या सुमारे दोनशे गोण्या व टेम्पो जप्त केला़ हे रेशनिंगचे धान्य असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याचा खुलासा बुधवारी होणार आहे़ दरम्यान, छापा पडताच टेम्पोचालक व त्यातील मजूर हे फरार झाले आहेत़ याबाबत अधिक माहिती अशी की, विल्होळी शिवारातील गट नंबर १४ येथे देव अॅग्रो फुड नावाचे गुदाम असून, मंगळवारी सायंकाळी या ठिकाणी धान्याचा टेम्पो (एमएच१५, एजी ३६०९) खाली होत होता़ तेथील ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी याबाबत तालुका पोलीस ठाणे, धान्य पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना माहिती दिली़ त्यानुसार तहसीलदार गणेश राठोड यांनी पोलिसांसमवेत गुदामावर छापा टाकला असता टेम्पोचालक व मजूर यांनी पलायन केले़ दरम्यान, हे गुदाम रोगे नावाच्या इसमाचे असून, ते साबळे नामक व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिल्याचे वृत्त आहे़ या गुदामामध्ये गहू व तांदळाच्या सुमारे दिडशे, तर टेम्पोमध्ये ५० गोण्या होत्या़ गुदामातील सर्व धान्य तहसीलदारांनी जप्त केले असून, गुदाम सील केले आहे़ तसेच धान्याची वाहतूक करणारा टेम्पोही जप्त केला आहे़ दरम्यान, जप्त केलेले धान्य हे रेशनिंगचे आहे की नाही याबाबत बुधवारी खुलासा होणार आहे़