आवक घटल्याने नाशकात कोथिंबिर २५ हजार रुपये शेकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:39 PM2019-07-10T17:39:41+5:302019-07-10T17:42:28+5:30
निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळस येथील शेतकरी नवनाथ घुटे या शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या प्रति जुडीला २५१ रुपये असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीत आडत बंद झाल्यानंतर पहिल्यांदा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या स्वयंपाक घरातून कोथिंबीर गायब झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत आहे. मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाला पंचवीस हजार शंभर रुपये शेकडा असा हंगामातील उच्चांक बाजारभाव मिळाला आहे.
निफाड तालुक्यातील रामाचे पिंपळस येथील शेतकरी नवनाथ घुटे या शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या प्रति जुडीला २५१ रुपये असा बाजारभाव मिळाला. बाजार समितीत आडत बंद झाल्यानंतर पहिल्यांदा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले. घुटे यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबीर विक्रीसाठी आणली होती.
गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीर प्रति जुडीला शंभर, दीडशे, दोनशे, सव्वा दोनशे ते थेट अडीचशे रुपये असा बाजारभाव मिळत आहे, तर वाढणा-या भावामुळे सर्वसामान्य ग्राहकांना कोथिंबीर घेण्यासाठी कमीत कमी शंभर रुपयांची नोट मोजावी लागत आहे. अनेक स्वयंपाक घरातून सध्या कोथिंबीर गायब झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरदेखील काही भागात पावसाने हजेरी लावली नाही. काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक खराब झाले त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. कोथिंबीर बाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले आहे, तर कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांनी उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.