तीन राज्यांच्या निकालामुळे समता परिषद फार्मात
By श्याम बागुल | Published: December 13, 2018 03:42 PM2018-12-13T15:42:02+5:302018-12-13T15:42:32+5:30
तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी राष्टÑवादी पक्षाचे प्रत्येक व्यासपीठ तर गाजवलेच, परंतु अखिल भारतीय समता परिषदेच्या संघटन विस्तारातही गुंतवून घेतले असून, त्यातूनच राज्यातील बीड, श्रीगोंदा, शहादा, सोनगीर या ठिकाणी समता मेळावे घेऊन मरगळलेल्या सैनिकांमध्ये जीव फुकला आहे.
श्याम बागुल
नाशिक : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांपैकी तीन प्रमुख राज्यांमध्ये कॉँग्रेसला मिळालेल्या यशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचाही खारीचा वाटा असल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले असून, परिषदेचे मध्य प्रदेशचे राज्य अध्यक्ष सिद्धार्थ कुशवाह, तर राजस्थानात दोन आमदारही समता विचाराचेच निवडून आल्याने समता परिषद फार्मात आली आहे. येत्या सोमवारी मुंबईत राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असल्याने या बैठकीत भुजबळ यांच्या राष्टÑीय राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी राष्टÑवादी पक्षाचे प्रत्येक व्यासपीठ तर गाजवलेच, परंतु अखिल भारतीय समता परिषदेच्या संघटन विस्तारातही गुंतवून घेतले असून, त्यातूनच राज्यातील बीड, श्रीगोंदा, शहादा, सोनगीर या ठिकाणी समता मेळावे घेऊन मरगळलेल्या सैनिकांमध्ये जीव फुकला आहे. नजीकच्या काळात सांगोला, वैजापूर, परभणी याठिकाणी मेळावे घेण्याची तयारी समता परिषदेने चालविली असताना, दुसरीकडे मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांत कॉँग्रेसला मिळालेल्या यशात बहुतांशी मतदारसंघात समता परिषदेने मोठा हातभार लावल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील सतना येथे समता परिषदेची मुहूर्तमेढ रोवणारे सिद्धार्थ कुशवाह हे मूळचे कॉँग्रेसी असले तरी, त्यांनी समतेचा झेंडा हाती घेतल्यामुळे त्यांच्यावर मध्य प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी सतना व लगतच्या जिल्ह्यांमध्ये समता परिषदेचा विस्तार केला, परिणामी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतनासह आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या विजयात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी स्वत: झोकून घेतले होते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळात सिद्धार्थ कुशवाह यांची वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, अशाच प्रकारे राजस्थानमध्येदेखील समता परिषदेच्या पुढाकाराने दोन जागांवर विजय मिळाला आहे. छतीसगढमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण निर्मितीत समता परिषदेने मोठा हातभार लावल्याचा दावा समता सैनिक करू लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एनडीएपासून नुकतीच फारकत घेतलेले बिहारचे राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष व समता परिषदेचे माजी प्रदेशाध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी बुधवारी पुण्यात छगन भुजबळ यांची भेट घेऊन आगामी राजकीय वाटचालीबाबत तब्बल दोन तास चर्चा केली त्यात बिहारच्या लोकसभा निवडणुकीत समता परिषद रिंगणात उतरण्याची तयारीच्या दृष्टीने चर्चा झाली. गेल्या निवडणुकीत कुशवाह यांच्यासह चार खासदार बिहारमधून समता परिषदेच्या झेंड्याखाली निवडून आले होते.