राजापूरला चारा टंचाईने पशुपालक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 04:45 PM2019-06-14T16:45:29+5:302019-06-14T16:45:43+5:30
शासनाचे दुर्लक्ष : चाराछावणीला अद्याप मुहूर्त नाही
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर हे गाव दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले असतानाही याठिकाणी शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून जनावरांसाठी चारा संपुष्टात आल्याने चारा टंचाईमुळे पशुपालक हैराण झाले आहेत.
राजापूर व परिसरात जनावरांचा चारा, पिण्यासाठी पाणी यांची टंचाई अधिक तीव्र होत चालली आहे. शासनाने अद्याप जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केलेल्या नाहीत. पशूपालकाकडे काही प्रमाणात बाहेरगावाहून आणलेला चारा संपून गेल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मृग नक्षत्र लागून पाच ते सहा दिवस होऊनही पावसाचे आगमन होत नसल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. येवला तालुक्यातील पूर्वकडील भागात मागील वर्षी खरीप पुर्णपणे वाया गेला असल्याने येथील चारा टंचाई निर्माण झाली आहे. मध्यंतरी चारा विकत आणून कसेबसे दिवस काढले. पण आता चारा विकत घेण्यासाठी पशूपालकांकडे पैसेही नाहीत. शेतकरी वर्ग पुरता डबघाईस आलेला आहे . राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथे दरवर्षी दुष्काळाची धग जाणवते. जनावरांना चारा नसल्यामुळे जनावरांनी खाऊन फेकलेली डाखळं सुध्दा आता जनावरं खात आहेत. प्रामुख्याने तालुूक्यातील पूर्व भागात सध्या चारा टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे . परिसरातील विहीरींनीही तळ गाठला आहे. राजापूर येथील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याची भयावह स्थिती आहे. याठिकाणी टॅकरच्या खेपा वाढून मिळाव्यात आणि जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी पशुपालक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.