सात तालुक्यांमध्ये ३६ टॅँकर्स सुरू पाणीटंचाई : ६६ गावे, ३७ वाड्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:28 AM2018-05-04T00:28:31+5:302018-05-04T00:28:31+5:30
नाशिक : जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या १३२ गाव व वाड्या-वस्त्यांची ११ तपासणी पथकांद्वारे पडताळणी करण्यात आली.
नाशिक : जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या १३२ गाव व वाड्या-वस्त्यांची ११ तपासणी पथकांद्वारे पडताळणी करण्यात आली असून, त्यानुसार पाण्याची आवश्यकता असलेल्या ७ तालुक्यांमधील ६६ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०३ गावे, वाड्या, वस्त्यांना ३६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. खरीप हंगामाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रस्तावित व मंजूर गावातील पाणीटंचाईबाबत तपासणी पथक समित्या नेमून पडताळणी करणेबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन याबाबत सूचना दिल्या व पडताळणीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता लघुपाटबंधारे विभाग, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांची ११ तपासणी पथके तयार करून प्रस्तावित व मंजूर टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंजूर ५५ गावे व ४२ वाड्या असे एकूण ९७ तर प्रस्तावित २० गावे व १५ वाड्या असे एकूण १३२ गावे, वाड्या, वस्त्यांची पडताळणी समितीने तपासणी केली. तपासणी पथकाच्या पाहणी अहवालानुसार मंजूर व प्रस्तावित टंचाईग्रस्त गावांमधील ४ गावे वगळता इतर सर्व गावे व वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ७ तालुक्यांमधील ६६ गावे व ३७ वाड्या अशा एकूण १०३ गावे, वाड्या, वस्त्यांना ३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.