दुष्काळात टंचाईमुळे पुनंदचे पाणी सोडा

By admin | Published: April 7, 2017 11:24 PM2017-04-07T23:24:14+5:302017-04-07T23:24:33+5:30

कळवण : पाणीप्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी पुनंद खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Due to shortage of drought, release the water of tears | दुष्काळात टंचाईमुळे पुनंदचे पाणी सोडा

दुष्काळात टंचाईमुळे पुनंदचे पाणी सोडा

Next

 कळवण : तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, पुनंद प्रकल्पाचे पाणी पुनंद नदीपात्रात, सुळे डावा व उजव्या कालव्यात पाणी सोडून पाणीप्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी पुनंद खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यंदा पावसाळा जास्त होऊनही विहिरींनी लवकर तळ गाठला आहे. त्यामुळे कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागातील गावांसह पुनंद खोऱ्यात म्हणजे दह्याने दिगर, दरेभणगी, मोकभणगी, भादवण, पिळकोस, सुळे, धार्डे दिगर, नाळीद, देसराणे, रवळजी, खेडगाव, विसापूर, गणोरे, ककाणे आदिंसह परिसरातील गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जनावरांबरोबर नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अशी परिस्थिती उद्भवल्याने भविष्यात मे, जून महिन्यात याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
पुनंद खोऱ्यातील ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीचा व ग्रामसभेचा ठरावही निवेदनासोबत जोडण्यात आला आहे. तसेच सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी., तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांचा पाणी सोडण्याबाबत सकारात्मक अहवाल जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देण्यात आला.
शिष्टमंडळात कळवण पंचायत समिती सदस्य लालाजी ठाकरे, पंचायत समिती सदस्य केदा ठाकरे, मोकभणगीचे उपसरपंच संजय शेवाळे, भास्कर भालेराव, बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, अविनाश शेवाळे, कौतिक गांगुर्डे, राजेंद्र शेवाळे आदि उपस्थित होते.
आदिवासी बांधवांनी जायचे कुठे?
कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सुपले, शेरी, भैताने, सावरपाडा, चिंचपाडा, पिंपळे, दह्याने, गणोरे, सुळे, लखानी, जयदर, खडकी, प्रतापनगर या धरणाच्या काठाशी असलेल्या गावांमध्ये सध्या पाणीटंचाई जाणवू लागल्याने ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी परिस्थिती आदिवासी बांधवांची झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने आदिवासी बांधवांनी पाण्यासाठी जायचे तरी कुठे, असा सवाल आदिवासी बांधवांनी केला आहे.
अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पात या भागातील आदिवासी बांधव व त्यांचे नातेवाईक, सगेसोयरे यांच्या जमिनी संपादित करून शासनाने प्रकल्प व त्याअंतर्गत कालवे बांधले. ज्या आदिवासी बांधवांच्या जमिनी गेल्या त्यांनाच आज पाण्यासाठी शासन व यंत्रणेच्या विनवण्या कराव्या लागत असून, या प्रकल्पाचे पाणी मिळण्यासाठी आदिवासी बांधवांना अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची परिस्थिती कळवण या पाण्याच्या सुजलाम सुफलाम आगारात निर्माण झाल्याची शोकांतिका आहे. यापूर्वी पाण्याची टंचाई निर्माण झाल्यावर प्रकल्पातून पाणी मिळत होते. आता मात्र परिस्थिती बदलल्याने पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. धरण उशाशी असूनसुद्धा पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आदिवासी भागात दिसून येत आहे.
पुनंद प्रकल्पातील पाण्यावर कळवण तालुक्याच्या लाभक्षेत्रातील जनतेचा प्रथम अधिकार असून, जनतेला शासन व यंत्रणेने प्रथम पाणी उपलब्ध करून द्यावे व नंतर पाण्यावर इतरांचा अधिकार ठेवून आरक्षण करावे, अशी मागणी कळवण तालुक्यातील जनतेने केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to shortage of drought, release the water of tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.