जल कुंभाचा स्लॅब कोसळल्याने देवळा पाणीपुरवठा बंद
By admin | Published: February 2, 2015 12:20 AM2015-02-02T00:20:45+5:302015-02-02T00:21:15+5:30
जल कुंभाचा स्लॅब कोसळल्याने देवळा पाणीपुरवठा बंद
देवळा : मुख्य जलकुंभाचा स्लॅब कोसळल्याने देवळा शहरासह आठ गावांना पाणीपुरवठा करणारी नडगाव सामुदायिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत या गावांचा पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणीपुरवठा दोन-तीन दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत सुरू होईल असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
देवळा नऊगाव पाणीपुरवठा योजना ही ६ नोव्हेंबर १९७१ रोजी कार्यान्वित करण्यात आली होती. त्यावेळच्या लोकसंख्येच्या आधारावर ही योजना राबविण्यात आली. कालांतराने लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ही योजना अपुरी पडू लागली. ४५ वर्षानंतर आजही ह्याच योजनेवर अवलंबून रहावे लागत असल्याने दरवर्षी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. हि जीर्ण झालेली योजनेत अनेक बिघाड नेहमी होत असतात. सदरची योजना ही गिरणा नदीला सोडलेल्या आवर्तनावर अवलंबून असल्याने नदीला आवर्तन सोडलेले नसते. त्यावेळी योजना उन्हाळ्यात बंद असते. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात देवळा शहरासह, सरस्वतीवाडी, माळवाडी, फुले माळवाडी, खुंटेवाडी, विजयनगर, आदी गावांना पाणींटचाईला तोंड द्यावे लागते. गत १५ दिवसांपासून गिरणा नदीला पाणी नसल्याने देवळा शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. यामुळे शहरातील अनेक भागात पुरेसे पाणी येत नव्हते. योजना पूर्णपणे बंद झाल्याने पाणीटंचाईच्या झळा आता मोठ्या प्रमाणात बसणार आहेत. गिरणा नदीला शनिवार दि. ३१ रोजी आवर्तन सोडण्यात आल्याने नागरीकांना दिलासा मिळाला होता. पुरेशा दाबाने आता पाणी मिळेल ह्या अपेक्षेत नागरीक असतांनाच शनिवारी सकाळी १० वाजता पाणी पुरवठा योजनेवरील सरस्वतीवाडी येथील मुख्य जलकुंभाचा दक्षिण बाजूकडील स्लॅब कोसळून जलकुंभात पडल्याने योजना बंद पडली.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत देवळा शहरासाठी अंदाजे साडेचार कोटी रुपये किंमतीची योजनेचे काम ६५ टक्के पूर्ण झाले असून जिल्हा परिषदेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १५ मार्च २०१५ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे.