दुबार पेरणीचे संकट टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:58 PM2018-08-19T22:58:51+5:302018-08-20T00:45:32+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.
येवला : गेल्या दोन महिन्यांपासून गायब झालेला पाऊस गुरुवारी (दि.१६) सकाळपासून बरसायला सुरुवात झाली. येवला तालुक्यात अनेक भागात मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे.
पावसाअभावी तालुक्यातील सुकण्यास, करपण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे उशिरा का होईना आलेल्या या पावसामुळे पिकांना अशंत: जीवदान मिळाले असून, सुकलेली मका, सोयाबीन पिके या पावसाने हिरवीगार व टवटवीत झाल्याचे चित्र आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी बळीराजाने मोठ्या उत्साहात केली होती. मुसळधार पडलेला पाऊस व हवामान खात्याने वर्तवलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पावसाने ओढ दिल्याने येवला तालुक्यातील संपूर्ण भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. कोटमगाव येथील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या साडेतीन एकर सोयाबीन पिकात पावसाअभावी नांगर फिरवला होता. मागील दहा-बारा दिवसांपूर्वी कोटमगाव परिसरात साठ ते सत्तर टक्के शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. येथील मका, सोयाबीनसारखी पिके उन्हाच्या झळा सोसून सुकली होती, तर काही पिके करपण्यास सुरुवात झाली होती. मानोरी येथील एक-दोन शेतकºयांनी मका पिकावर नांगर फिरवला होता. परंतु १६ आॅगस्टला झालेल्या पावसाने येवला तालुक्यावरील दुबार पेरणीचे संकट पुढचे काही दिवस टळले असल्याने शेतकरी या पावसामुळे सुखावल्याचे बघायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून शेतकरी पुन्हा मशागतीची कामे करताना दिसत आहे. मका व सोयाबीनला युरिया टाकताना दिसत आहे. या पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील सुकलेली पिके हिरवीगार दिसत आहे. या पावसाने काही दिवसापुरते पिकांना जीवदान दिले असून, काही भागातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
शेतातील विहिरी अजूनही कोरड्याठाक आहेत.
येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील कार्यान्वित असलेली ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र वाड्या-वस्त्यांवर विदारक चित्र निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात बºयापैकी पडलेल्या पावसाने पालखेड डाव्या कालव्यातून येवला तालुक्यात आवर्तन सुरू आहे. या आवर्तनातून पश्चिम भागातील गोई नदीला पाणी सोडण्यात यावे तसेच वितरिका नंबर २१,२५ आणि २८ ला या आवर्तनातून चाºयांना पाणी सोडावे. या वितरिका आणि बंधारे भरल्याने विहिरींना पाणी उतरण्यास मदत होऊन पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याने या वितरिका आणि बंधारे पालखेडच्या आवर्तनातून भरून मिळावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
पिके झाली हिरवीगार
दीड महिन्यापासून शेतात जावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सुरु वातीच्या पावसाने उतरलेली खरीप पिके दीड महिन्यापासून पाण्याविना सुकल्याने करपू लागली होती. परंतु या थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसाने खरीप पिके हिरवीगार झाल्याने दुबार पेरणीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.