दहावी, बारावीच्या शिक्षकांना दिलासा?

By admin | Published: February 12, 2017 12:20 AM2017-02-12T00:20:58+5:302017-02-12T00:21:12+5:30

आयोगाचे संदिग्ध आदेश : शिक्षक संभ्रमात

Due to tenth, HSC teachers? | दहावी, बारावीच्या शिक्षकांना दिलासा?

दहावी, बारावीच्या शिक्षकांना दिलासा?

Next

नाशिक : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखीपरीक्षा महिनाअखेर म्हणजेच जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीनंतर असली तरी, सध्या या विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय, महाविद्यालयीन परीक्षा घेतल्या जात आहेत. अशा परिस्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामात वगळण्यासाठी केल्या जाणाऱ्या मागणीवर राज्य निवडणूक आयोगाने संदिग्ध आदेश काढल्याने शिक्षक आणखीच संभ्रमात सापडले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाते. त्यात विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकल, प्रोजेक्ट सादर करणेही बंधनकारक असते. आंतरशालेय वा महाविद्यालयीन परीक्षांचे गुण विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणपत्रकात समाविष्ट केले जातात. सध्या गेल्या आठवड्यापासून शिक्षक याच कामात गुंतलेले आहेत. तथापि, सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकेची निवडणूक तयारी सुरू असून, मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची निकड भासत असल्याने सर्व शिक्षकांची नेमणूक या कामासाठी करण्यात आली आहे. या शिक्षकांना निवडणुकीचे प्रशिक्षणही दिले जात असल्यामुळे दहावी, बारावीच्या शिक्षकांची हेळसांड होऊ लागली आहे.
प्रशिक्षणाला दांडी मारल्यास कारणे दाखवा नोटिसा व कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असून, शाळेकडे दुर्लक्ष केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत शिक्षक संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असता, त्याची दखल घेत आयोगाने सर्व जिल्हाधिकारी, सर्व महापालिकांचे आयुक्तांना पत्र पाठवून परीक्षेच्या कामासाठी कमीत कमी आवश्यक असलेल्या शिक्षकांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या कामातून सूट देण्याचा शक्य असल्यास विचार करावा, असे त्यात म्हटले आहे.

Web Title: Due to tenth, HSC teachers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.