ऊसाचे पेमेंट थकविल्याने शेतकऱ्यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:10 PM2019-11-15T18:10:09+5:302019-11-15T18:10:30+5:30
प्रहारचा मोर्चा : थकबाकी देण्याची मागणी
सायखेडा : निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील निपाणी पिंपळगाव येथील कादवा, गोदा शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवल्याने प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी निफाड येथे रास्तारोको करून मोर्चा काढला. दरम्यान, तहसीलदार दीपक पाटील यांच्या मध्यस्थीने आणि कारखाना व्यवस्थापक यांची शेतक-यांसोबत बैठक घेणार असल्याच्या आश्वासनानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
गोदाकाठ भागातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी यांनी के.जी. एस कारखान्याला ऊस दिला. अनेक वर्षे होऊनही पेमेंट मिळत नसल्याने शेतक-यांनी अनेकवेळा आंदोलने केली. शेतक-यांच्या या प्रश्नावर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्तारोको करण्यात येऊन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात प्रहारचे उत्तर महाराष्ट संपर्कप्रमुख दत्तू बोडके, नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, नाशिक शहर प्रमुख शाम गोसावी, नाशिक जिल्हा युवा आघाडी प्रमुख जगन काकडे ,प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख दत्ता आरोटे , निफाड तालुका प्रमुख अमोल ब्राह्मणे, राजे थेटे, तालुका संपर्क प्रमुख किशोर शिंदे, तालुका संघटक दिपक आवार,े उपतालुकाध्यक्ष ऋ षिकेश वाघ, ऋ षिकेश सांगळे, शुभम आव्हाड, किरण चकोर आदींसह सोनगाव, सायखेडा, चितेगाव, तळवडे, मांजरगाव, चापडगाव, खानगाव, तामसवाडी येथील इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.