कांदा भावात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावी बंद पाडले लिलाव
By प्रसाद गो.जोशी | Published: January 29, 2024 03:11 PM2024-01-29T15:11:31+5:302024-01-29T15:11:50+5:30
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांद्याची निर्यात बंदी तात्काळ हटवावी तसेच विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली
लासलगाव (शेखर देसाई) :- कांद्याचे बाजारभाव ८०० ते९०० रुपयांपर्यंत खाली आल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली. त्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल दीड तास कांद्याचे लिलाव बंद पाडले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांद्याची निर्यात बंदी तात्काळ हटवावी तसेच विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी ९ वाजता कांद्याचे लिलाव सुरु झाले. यावेळी कांद्याचे दर एक हजार रुपयांच्या वर जात नसल्याने भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव पुकारणे बंद केले अचानक कांद्याचे लिलाव बंद पडल्याने यावेळी बाजार समिती प्रशासन व पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली. बाजार समिती प्रशासन व पोलिसांच्या विनंती नंतर बाजार समितीच्या आवारात ठिय्या मांडून बसलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केल्याने बंद पडलेले कांद्याचे लिलाव दीड तासानंतर पुन्हा सुरु केले.