‘मिशन भगीरथ’मुळे ऐन दुष्काळी स्थितीत ४६७ सघमी पाणीसाठ्याची भर!
By धनंजय रिसोडकर | Published: September 16, 2023 03:28 PM2023-09-16T15:28:54+5:302023-09-16T15:29:53+5:30
जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून ११० कोटींच्या या योजनेतून पहिल्याच वर्षी ४६७ दलघफू साठा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, धनंजय रिसोडकर नाशिक: जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने रोजगार हमी योजनेतून राबवलेल्या मिशन भगीरथमधून नुकत्याच झालेल्या पावसात ४६७ सघमी (सहस्त्र घनफूट मीटर) पाणीसाठा झाला आहे. जिल्हा परिषदेने या वर्षात रोजगार हमी योजनेतून ३६५ बंधारे मंजूर केले असून त्यातील १६३ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांपैकी ५२ बंधाऱ्यांमध्ये मागील आठवड्यातील पावसामुळे पाणीसाठा झाला आहे. जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून ११० कोटींच्या या योजनेतून पहिल्याच वर्षी ४६७ दलघफू साठा झाला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाची कामे करण्यासाठी ‘मिशन भगीरथ’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून गावांची निवड करून तेथे साखळी बंधारे प्रस्तावित केले असून, यासाठी रोजगार हमी योजनेचा निधी वापरला जात आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने केलेल्या आराखड्यानुसार १५ तालुक्यांमध्ये ६०९ बंधारे प्रस्तावित केले आहेत. यापैकी आतापर्यंत ३६५ बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी १६३ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे बंधारे बांधूनही ऑगस्टअखेरपर्यंतही त्यात साठा झालेला नव्हता. दरम्यान, गत आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, बागलाण, कळवण या तालुक्यांमधील ५२ बंधारे तुडुंब भरले आहेत. यामुळे जिल्ह्यात ४६७ सघमी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी या पाण्याचा फायदा होणार आहे.