ओखी चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील तेराशे हेक्टरचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:24 PM2018-01-13T14:24:13+5:302018-01-13T14:26:44+5:30
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रालाही धडक दिल्यामुळे त्याचे परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांवर झाले. नाशिक जिल्ह्यात ४ ते ६ डिसेंबर या काळात ढगाळ हवामान व कडाक्याच्या थंडीचे वारे वाहून काही ठिकाणी पावसाने झोडपूनही काढले. या पावसामुळे साधारणत: द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले.
नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाई पोटी दोन कोटी ३३ लाख रुपयांची गरज असून, कृषी विभागाने पीक पंचनामे पूर्ण करून दिलेल्या अहवालाच्या आधारे शासनाकडे रकमेची मागणी करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रालाही धडक दिल्यामुळे त्याचे परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांवर झाले. नाशिक जिल्ह्यात ४ ते ६ डिसेंबर या काळात ढगाळ हवामान व कडाक्याच्या थंडीचे वारे वाहून काही ठिकाणी पावसाने झोडपूनही काढले. या पावसामुळे साधारणत: द्राक्ष पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक द्राक्षबागांमध्ये पावसाचे पाणी साचले, तर काही ठिकाणी घडे जमिनीवर पडले. कडाक्याच्या थंडीने द्राक्ष मण्यांना तडे जाण्याचे प्रकारही घडले. याशिवाय खळ्यात काढून ठेवलेला कांदा व मक्याचे पीक भिजले, काही ठिकाणी गहू जमीनदोस्त झाला. नाशिकसह राज्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना, शासनाने आठ दिवस उशिराने पीक पंचनाम्याचे आदेश दिले, परिणामी शेतकºयांनी शेतात झालेल्या नुकसानीची सारवासारवी करून घेतली त्यामुळे पीक पंचनामे करताना मोठी अडचण निर्माण झाली. या संदर्भात शासनाकडे तक्रारी करण्यात आल्याने, शासकीय यंत्रणा पीक पंचनामे करतेवेळी संबंधित शेतक-यांनी शेतात हजर राहावे, अशा सूचनाही केल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील १७० गावांना ओखी वादळाचा फटका बसून, १५०६ शेतक-यांच्या ताब्यातील १२९५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले.
शासनाने ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना बागायत पिकांखालील क्षेत्रासाठी दोन हेक्टरपर्यंत १३,५०० रुपये, तर फळपिकाखालील क्षेत्रासाठी १८,००० रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील शेतक-यांना नुकसानभरपाई पोटी दोन कोटी ३३ लाख ८,२९० रुपयांची गरज आहे. कृषी खात्याने अंतिम पंचनामे करून तसा प्रस्ताव जिल्हाधिका-यांना सादर केला असून, शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.