पाणीप्रश्न यंत्रणेमुळेच चिघळला
By admin | Published: September 26, 2015 09:40 PM2015-09-26T21:40:36+5:302015-09-26T21:42:49+5:30
आरोप : नांदगाव नगर परिषदेची पाणीपुरवठा, विकासकामांसंदर्भात बैठक
नांदगाव : शहराच्या पाणीप्रश्नी वाढत्या तक्रारींची दखल घेत आमदार पंकज भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नांदगाव नगर परिषदेच्या सभागृहात बैठक झाली. पाणीप्रश्न व विकासकामांसंदर्भात चर्चा झाली. बैठकीस नगराध्यक्ष, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व संबंधित उपस्थित होते.
नांदगावचा पाणीप्रश्न जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेमुळे वारंवार चिघळत असल्याचे प्रतिपादन नगरसेवकांनी केले. दोनऐवजी एका पंपाने पाणीपुरवठा होत असल्याने दिलेल्या वेळेत कमी पाणीपुरवठा होतो. तसेच जलवाहिन्यांच्या गळतीकडे दुर्लक्ष होत असते. गळतीच्या जागा त्वरित दुरुस्त केल्या जात नाहीत. या कारणांमुळे पाणीटंचाई निर्माण होत असल्याचा आरोप नगरसेवक विश्वास आहिरे, रमेश करवा व नगरसेवक इंदिरा बनकर यांनी केला.जिल्हा परिषदेची पाण्याची टाकी अनेक वर्षात साफ केली नसल्याने तिच्यात गाळ साठला आहे. म्हणून तिची क्षमता कमी झाली आहे. वरील मुद्द्यांवर नगरसेवक व जिल्हा परिषदेचे उपअभियंता प्रकाश बोरसे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. बोरसे यांनी नगरसेवकांचे म्हणणे असत्य असल्याचे प्रतिपादन केले. नगर परिषद प्रशासनाने तोट्या न बसवलेले नळ, मुख्य जलवाहिनीवरच्या जोडण्या यावर कारवाई करावी, असे सर्वानुमते ठरले. नवीन पंप खरेदीसाठी जिल्हा परिषदेला कळवावे तसेच गळती दुरुस्ती व पाण्याची टाकी साफ करण्याच्या सूचना आमदार भुजबळ यांनी बोरसे यांना दिल्या.नगर परिषद प्रशासन गावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करते असा आरोप नगरसेवकांनी केला. त्याच बरोबर पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम करण्यासाठी उपाययोजना व व्हॉल्व्ह दुरुस्ती करण्यात यावी या नगरसेवकांच्या सूचनांवर सकारात्मक निर्देश आमदार भुजबळ यांनी दिले. याशिवाय पुढील विषयांवर चर्चा झाली. त्यात आमदार भुजबळ यांनी पुढील पावले उचलण्यासंदर्भात योग्य सूचना केल्या. शहरात कम्युनिटी सभागृह, स्मशानभूमीकडे जाणारा पूल व पालिका कार्यालयामागून जैन धर्मशाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्यात यावेत, मुस्लीम समाजासाठी कब्रस्तानच्या नवीन जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावा असे विषय नगराध्यक्ष शैलाताई गायकवाड यांनी मांडले. बैठकीस नगराध्यक्ष शैलाताई गायकवाड, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, नगरसेवक इंदिरा बनकर, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, नीलदादा सोनवणे, विश्वास आहिरे, सुनील जाधव, भाऊसाहेब काकलीज, इक्बाल शेख, रमेश करवा, गंगाभाऊ करनर, संतोष खुरासणे, आमदार पंकज भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक अशोक गायकवाड, अभियंता प्रकाश बोरसे, अभियंता देशमुख व अभिजित इनामदार, पाणीपुरवठ्याचे मदन हिरे, सुनील ढासे, कार्यालयीन अधीक्षक कोरान्ने व इतर उपस्थित होते. (वार्ताहर)