मोसम नदी पात्रातील पाणवेलींमुळे आरोग्य धोक्यात
By admin | Published: July 22, 2014 10:42 PM2014-07-22T22:42:24+5:302014-07-23T00:26:19+5:30
मोसम नदी पात्रातील पाणवेलींमुळे आरोग्य धोक्यात
संगमेश्वर : मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीला पुन्हा एकदा हिरव्यागार पाणवेलींचा विळखा पडला आहे. आरोग्यास घातक ठरणाऱ्या या पाणवेली त्वरित दूर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मोसम ते आंबेडकरपूल दरम्यानच्या नदीपात्रास संपूर्ण पाणवेलींनी वेढला असून, या हिरव्यागार पाणवेलींमुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. परिणामी या परिसरात सायंकाळनंतर डासांच्या मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ सुरू असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले आहेत. गतवर्षी संपूर्ण नदीपात्रात पसरलेल्या पाणवेली जनमताच्या रेट्यामुळे महापालिका प्रशासनाने काढल्या होत्या. त्यानंतर पुन्हा या पाणवेलींनी हा परिसर पूर्णपणे आच्छादल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्यास घातक ठरणाऱ्या या पाणवेली त्वरित दूर करण्याची गरज आहे. नदीपात्रात मरीआईचे स्थान आहे. सध्या आषाढ महिना सुरू आहे. या महिन्यात मरीआईस नैवेद्य दाखविला जातो. यासाठी परिसरातून हजारो स्त्रिया येतात. मात्र परिसर घाणीने भरला असून, दुर्गंधीयुक्त वातावरणात कसाबसा पूजेचा कार्यक्रम उरकावा लागतो.
परिसर स्वच्छ करण्याची मागणी या भागातील नागरिक धनंजय अस्मर, युवा गिते, नामदेवराव वारुळे, यशवंत गिते, दिलीप वडगे, मनोज चव्हाण आदिंनी एका निवेदनाद्वारे स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
(वार्ताहर)