‘बम बम भोले’च्या गजराने दुमदुमले मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:22 AM2019-08-27T01:22:47+5:302019-08-27T01:23:24+5:30
‘हर हर महादेव’, ‘कपालेश्वर भगवान की जय हो’ असा जयघोष करत शेकडो शिवभक्तांनी श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गंगाघाटावर असलेल्या कपालेश्वर मंदिरासह अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला.
पंचवटी : ‘हर हर महादेव’, ‘कपालेश्वर भगवान की जय हो’ असा जयघोष करत शेकडो शिवभक्तांनी श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गंगाघाटावर असलेल्या कपालेश्वर मंदिरासह अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. अखरेचा श्रावण सोमवार असल्याने भाविकांनी कपालेश्वर मंदिरात दर्शनाला पहाटेपासून गर्दी केली होती.
सोमवारी सकाळी कपालेश्वर मंदिरातील गुरवांच्या उपस्थितीत महादेवाला विधिवत अभिषेक करण्यात आला. सोमवारनिमित्त दुपारी कपालेश्वर मंदिर येथून फुलांनी सजविलेल्या पालखीतून महादेवाच्या पंचमुखी चांदीच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिसरात पूजा साहित्य विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली, तर मंदिरात विविध धार्मिक विधी अभिषेक करण्यासाठी भाविकांनी ब्रह्मवृंदांकडे मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी येणारे भाविक ‘हर हर महादेव, बम बम भोले’ असा जयघोष भाविक करत असल्याने मंदिर परिसर भगवान महादेवाच्या नामघोषाने दुमदुमून गेला होता.