हरसूल परिसरात पावसाचा प्रचारात खोडा
By admin | Published: October 11, 2014 10:13 PM2014-10-11T22:13:07+5:302014-10-11T22:13:07+5:30
हरसूल परिसरात पावसाचा प्रचारात खोडा
हरसूल : मतदानाला चार दिवस शिल्लक असताना आणि सर्वत्र प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला असताना हरसूलमध्ये मात्र पावसाने प्रचारात खोडा घालण्याचे काम चालविले असल्याचे चित्र दिसत आहे. पावसामुळे शेतपिकांना जीवदान मिळत असल्याने बळीराजा सुखावला असला तरी राजकीय कार्यकर्त्यांना मात्र अनेक मार्गांनी याचा फटका बसत आहे. पावसामुळे प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करणे अवघड होऊन बसले आहे. निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या पक्ष कार्यालयांची मोडतोड होत आहे. सावलीसाठी उभारलेले मंडप कोलमडून पडत आहे. एरवी प्रचारासाठी सहजतेने उपलब्ध होणारे शेतमजूर सध्या शेतकामात मग्न असल्याने प्रचारकांची कमी जाणवते आहे. एकीकडे दुपारनंतर पाऊस सुरू होत असल्याने सकाळच्या वेळेत तरी मतदारांना गाठू म्हणून निघालेल्या कार्यकर्त्यांना घराचे कुलूप पाहून परतावे लागत आहे. तर दुसरीकडे भुईमूग काढणीसाठी आलेले ्र्रअसल्याने घराला कुलूप लावून अनेक शेतकरी पहाटेच शेतावर हजर होत आहे. शेतकामांमुळे शेतकरी शेतावर असल्याने अनेक गावे, वाड्या व पाडे निर्मनुष्य दिसत आहे. रिकाम्या गावांमध्ये प्रचारकांची कमतरता असल्याने रिकाम्या गाड्यांमधून उमेदवाराचा केला जाणारा उद्घोष हवेतच विरत आहे. यातच सामान्य शेतकरी असलेल्या पक्ष कार्यकर्त्याला प्रचार करावा की शेतातली कामे उरकावी, असा प्रश्न पडला आहे. एरवी निवडणुकीच्या माहोलास अनुकूल परिस्थिती उपलब्ध होत असताना हरसूलसारख्या ग्रामीण भागात मात्र प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)