दुचाकीस्वारांवर बिबट्याची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:52 AM2019-05-27T00:52:54+5:302019-05-27T00:53:11+5:30
तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले चढविल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील जनावरांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्याने आता मानवांवरदेखील झडप घातल्याने परिसरात अनेक गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
एकलहरे : तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले चढविल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील जनावरांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्याने आता मानवांवरदेखील झडप घातल्याने परिसरात अनेक गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
शनिवारी सायंकाळी चांदगिरी येथे दुचाकीवरून जाणाºया कुटुंबावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असतानाच रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास पुन्हा एका दुचाकीस्वारावर बिबट्याने झडप घालून त्यास जखमी केले.
उसाच्या शेतामध्ये वास्तव्य असलेल्या बिबट्याचे अनेक ठिकाणी दर्शन घडू लागल्याने परिसरातील गावांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आजूबाजूच्या गावांमध्ये जनावरांना भक्ष्य केलेल्या या बिबट्याने आता मानवांवर हल्ले केल्यामुळे हिंगणवेढे, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी आदि गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या शनिवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास चांदगिरी गावातील शरद बागूल यांच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीस्वार दौलत पवार यावर हल्ला केला. पिंपळस येथील पवार हे पत्नी आणि मुलांसोबत जात असताना बिबट्याने उसाच्या शेतातून त्यांच्यावर झडप घातली. यात तिघेही जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास जाखोरी येथील विश्वास कळमकर यांच्या शेतात काम करणारे शेतमजूर मधुकर बरब व एकनाथ गरेल हे मोटारसायकलवरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन घडत आहे. या भागात किमान पाच बिबटे असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. नर-मादी व त्यांची दोन बछडे तसेच अन्य एक बिबट्या परिसरात असावा असा संशय आहे.