पिंपळगाव बसवंत येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ

By admin | Published: June 24, 2017 12:53 AM2017-06-24T00:53:28+5:302017-06-24T00:53:40+5:30

पिंपळगाव बसवंत : येथील आझादनगर परिसरात दहा दरोडेखोरांच्या टोळीने गुरुवारी मध्यरात्री धुमाकूळ घालून रवींद्र मोरे यांच्या घरात दरोडा टाकून दहा हजार रुपये रोख व सोने चोरून नेले

Dumpster in Pimpalgaon Baswant | पिंपळगाव बसवंत येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ

पिंपळगाव बसवंत येथे दरोडेखोरांचा धुमाकूळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड रोडवरील आझादनगर परिसरात सुमारे दहा दरोडेखोरांच्या टोळीने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र मोरे यांच्या घरात दरोडा टाकून दहा हजार रुपये रोख व सोने चोरून नेले. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत रवींद्र मोरे व त्यांच्या वहिनी शीतल मोरे जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात दरोडेखोर अर्धा ते पाऊण तास धुमाकूळ घालत असताना पोलिसांना त्याचा थांगपत्ता तर लागला नाहीच, शिवाय घटनेदरम्यान एका नागरिकाने पोलीस ठाण्यात केलेला दूरध्वनीही उचलला गेला नसल्याने पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
पिंपळगाव बसवंत येथील आझादनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दहा दरोडेखोरांच्या टोळीने प्रवेश करून प्रथम बाळासाहेब महाले यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा न तुटल्याने यापैकी सात जणांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या मोरे यांच्या बंगल्याकडे वळवला. पहाटे साडे तीन वाजता मोरे यांच्या घराच्या स्वयंपाकघराचा दरवाजा कटवनी व गिरमीटने होल पाडून तोडला. दोघांना बाहेर पहाऱ्यावर ठेवत पाच दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. दरम्यान आवाजाने घरात झोपलेल्या शीतल मोरे या जाग्या झाल्या. घरात दरोडेखोर शिरल्याचे पाहून त्यांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने दुसऱ्या खोलीत झोपलेले रवींद्र मोरे हे जागे झाले. त्यांनी स्वयंपाक खोलीकडे धाव घेतली. दोन दरोडेखोर व रवींद्र मोरे यांच्यात चांगलीच झटापट झाली. दरोडेखोरांच्या संख्याबळापुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते बेशुद्ध पडले. या झटापटीत त्यांच्या वहिनी शीतल मोरे याही जखमी झाल्या. चोरट्यांनी घरातील लहान मुलांना एका खोलीत बंद करून आरडाओरड न करण्याचा त्यांना दम दिला. घराचे इतर सर्व दरवाजे बंद करुन कपाटांची आणि सामानाची उस्तर पास्तर करण्यास सुरुवात केली. मुलांच्या शाळेसाठी ठेवलेले दहा हजार रुपये रोख व शीतल मोरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला.  दरोडेखोरांबरोबर झालेल्या झटापटीत रवींद्र मोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याना नाशिक येथील तर शीतल मोरे यांना पिंपळगाव बसवंत येथे खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरच्या बंगल्यात अकरा माणसांचे कुटूंब राहत असून शीतल मोरे यांचे पती योगेश रामदास मोरे हे भारतीय लष्करात कार्यरत असून सध्या त्रिपुरा येथे सेवा बजावत आहेत.  मोरे यांच्या घरात दरोडेखोर शिरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या समोर राहणारे दीपक भिकाजी शिंदे यांनी मित्रांना भ्रमणध्वनी करण्याचा प्रयत्न केला. बाहेर उभ्या असलेल्या दरोडेखोरांना त्यांचा आवाज आल्याने त्यांनी शिंदे यांच्या घरावर दगडफेक केली. यात घराच्या काचा व गाडीच्या काचा फुटल्या .
दरम्यान रवींद्र मोरे यांच्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे आहे. घटना घडत असतानाच परिसरातील सोमनाथ निकम यांनी पोलीस ठाण्यात फोन केला होता, मात्र फोन उचलला गेला नाही . सुमारे अर्धा पाऊण तास परिसरात गोंधळ सुरू असूनही हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांना याचा थांगपत्ताही लागला नाही. दरोडेखोरांच्या टोळीत दहा जणांचा समावेश असून सात जण मोरे यांच्या बंगल्यात चोरी करीत असताना अन्य तिघे परिसरात मोटरसायकल चोरीचा प्रयत्न करीत होते. राहुल कदम यांची मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न करीत असतांना चोरट्यांनी घरावरदगड फेक केली.
पहाटे चार वाजता अग्निशमन दलाचे दहा कर्मचारी व ग्राम पंचायत सदस्य भास्कर बनकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परीसर पिंजून काढला मात्र चोरटे पसार झाले. भास्कर बनकर यांनी पोलीसांना दूरध्वनी करुन या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले श्वानाने पाटापर्यत मार्ग दाखवला.  पोलीस अधीक्षक संदीप दराडे ,पोलीस उपअधीक्षक विशाल गायकवाड, घोगरे, नवले, ठसेतज्ज्ञ .बी.एन.कांबळे, जे.टी.गवळी, एस.एन.सरोदे, एन .एम. अमृतकर आदिनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाऊण तास गोंधळ...
रवींद्र मोरे यांच्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे आहे. घटना घडत असतानाच परिसरातील सोमनाथ निकम यांनी पोलीस ठाण्यात फोन केला होता, मात्र फोन उचलला गेला नाही. सुमारे अर्धा-पाऊण तास परिसरात गोंधळ सुरू असूनही हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांना याचा थांगपत्ताही लागला नाही. दरोडेखोरांच्या टोळीत दहा जणांचा समावेश असून, सात जण मोरे यांच्या बंगल्यात चोरी करीत असताना अन्य तिघे परिसरात मोटारसायकल चोरीचा प्रयत्न करीत होते. राहुल कदम यांची मोटारसायकल चोरण्याचा प्रयत्न करीत असताना चोरट्यांनी दगडफेक केली.

Web Title: Dumpster in Pimpalgaon Baswant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.