ग्रामीण भागात गोबर गॅस कालबाह्य होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:48+5:302020-12-14T04:30:48+5:30
वाके : ग्रामीण भागात शेतीच्या कामात ट्रॅक्टरसह आधुनिक यांत्रिक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने मोठ्या शेतकऱ्यांसह, अल्प ...
वाके : ग्रामीण भागात शेतीच्या कामात ट्रॅक्टरसह आधुनिक यांत्रिक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने मोठ्या शेतकऱ्यांसह, अल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतोपयोगी जनावरांना पाळणे कठीण झाले आहे. परिणामी खेडोपाडी ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी एकेकाळी महत्त्वाचा घटक असणारा गोबर गॅस आज कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो कारण देशामध्ये आजही७५ % शेती व्यवसाय केला जातो. पूर्वी घरोघरी शेतकऱ्यांकडे शेतीच्या उपयोगासाठी बैलजोडीसह गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्यासह दुधाळ जनावरे मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. शेताबरोबर दुग्धव्यवसायासाठी या पाळीव प्राण्यांचा उपयोग होत असे. ज्यांच्याकडे पाळीव जनावरे आहेत अशा बहुतांश शेतकऱ्यांकडे घरी हमखास शासन अनुदानातून किंवा खासगी खर्चातून गोबर गॅस सयंत्र बसविण्यात आली होती. या गोबर गॅसमुळे स्वयंपाकासाठी धुरविरहित गॅस चुलीमुळे प्रदूषण रोखण्यासाठी मदत तसेच झटपट स्वयंपाक करता येत होता, शिवाय गोबर गॅस सयंत्रातून निघणाऱ्या शेणकुटापासून नैसर्गिक सेंद्रिय शेणखत मिळत असे, मात्र आता दिवसेंदिवस शेतीच्या आधुनिकरणात शेतकऱ्यांजवळील पशुधन कमी झाल्याने ग्रामीण भागातील गोबर गॅस कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.