नागपूरच्या नाट्यसंमेलनात नाशिकचा वाजणार डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 06:41 PM2019-02-18T18:41:29+5:302019-02-18T18:41:53+5:30
‘विसर्जन’ची निवड : एकांकिकेसह ‘मुक्ती’चेही सादरीकरण
नाशिक : नागपूर येथे येत्या २२ ते २४ फेबु्रवारी या कालावधीत होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात नाशिकचा डंका वाजणार असून नाट्यसंमेलनात दत्ता पाटील लिखित ‘विसर्जन’ नाटकाबरोबरच नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या एकांकिकेचेही सादरीकरण होणार आहे. याशिवाय, नाशिकच्याच प्राजक्त देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘मुक्ती’ या संगीतयात्रेचेही आयोजन करण्यात आले आहे.
नागपूरच्या नाट्यसंमेलनात दि. २३ फेबु्रवारी रोजी दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित ‘विसर्जन’ या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण होणार आहे. विश्वास ठाकूर निर्मित या नाटकाने नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या नाटकात नीलेश सूर्यवंशी, दीप्ती चंद्रात्रे, धनंजय गोसावी यांच्यासह २७ नाशिककर कलावंत भूमिका साकारत आहेत. आनंद ओक आणि रोहित सरोदे यांचे संगीत असून राहुल गायकवाड यांची प्रकाशयोजना आहे. लक्ष्मण कोकणे आणि शेखर सरोदे यांनी नेपथ्याची बाजू सांभाळली आहे. नाशिकच्या नाट्यपरिषद शाखेने या नाटकाची नाट्यसंमेलनासाठी शिफारस केली होती. या नाटकाबरोबरच दि. २३ फेबु्रवारीलाच नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्यावतीने ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे. प्रिया जैन लिखित आणि आंनद व कृतार्थ दिग्दर्शित या नाटकात कृतार्थ कन्सारा, मंजुषा फणसळकर, प्रतिक विसपुते, प्रसाद काळे, जुई खामकर, हृषिकेश मांडे हे नाशिककर कलावंत भूमिका साकारत आहेत. संगीत रोहित जाधव व जितेंद्र सोनार यांचे असून प्रणव सपकाळे यांची प्रकाशयोजना आहे. धनंजय निकम यांनी नेपथ्याची बाजू सांभाळली आहे.
संगीतयात्रेने वाजणार सूप
सध्या व्यावसायिक रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाच्या माध्यमातून नाशिकचे नाव उंचावणा-या प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित ‘मुक्ती’ या संगीत मैफलीचेही नाट्यसंमेलनात आयोजन करण्यात आले आहे. संत कवयित्रींवर आधारित या संगीत यात्रेनेच नाट्यसंमेलनाचे सूप वाजणार आहे.