एकलहरा राखेच्या टाकाऊतून टिकाऊचा वापर
By admin | Published: September 20, 2015 11:09 PM2015-09-20T23:09:54+5:302015-09-20T23:14:34+5:30
एकलहरा राखेच्या टाकाऊतून टिकाऊचा वापर
नाशिक : सर विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने अभियंता दिनाच्या औचित्यावर ‘औष्णिक विद्युत केंद्रातून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा टाकाऊतून टिकाऊ वापर’ या विषयावर जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, अनिल अहिरे, कुसुमाडे, प्रकाश नंदनवरे, आर. एस. परदेशी आदि उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहिली. नाशिक जिल्हा फ्लॅय अॅश असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मेंढेकर, समन्वयक राजेश पंडित यांनी हरित कुंभाविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सांगितले की, औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचा जर आपण वापर केला नाही, तर भावी पिढ्या आपणास क्षमा करणार नाहीत. या राखेचा उपयोग करून अभियंत्यांनी गुणवत्तापूर्वक कामे करून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे केल्यास पुढील भावी पिढ्या आपणाबाबत अभिमान बाळगतील. या कार्यशाळेस जिल्ह्यातील उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच स्थापत्य सहायक यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)