‘दुर्गे दुर्गट भारी’... आदिशक्ती मातेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:52 AM2019-09-30T00:52:37+5:302019-09-30T00:53:04+5:30
‘दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी अनाथ नाथे अंबे’, ‘अनादी निर्गुण प्रगटली भवानी’, जयदेवी जयदेवी सप्तशृंगी माता, उदो, उदो आंबाबाईचा, ‘माझी रेणुका माउली’, ‘जयजयकार तुळजाभवानीचा’ अशा अनेक भक्तिगीतांच्या आणि आरतीच्या गजरात आदिशक्तीचा जागर करीत नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. २९) घरोघरी घटस्थापना करण्यात आली.
नाशिक : ‘दुर्गे दुर्गट भारी तुजवीण संसारी अनाथ नाथे अंबे’, ‘अनादी निर्गुण प्रगटली भवानी’, जयदेवी जयदेवी सप्तशृंगी माता, उदो, उदो आंबाबाईचा, ‘माझी रेणुका माउली’, ‘जयजयकार तुळजाभवानीचा’ अशा अनेक भक्तिगीतांच्या आणि आरतीच्या गजरात आदिशक्तीचा जागर करीत नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. २९) घरोघरी घटस्थापना करण्यात आली. तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीने देवी मूर्तीची आकर्षक सजावट करून महापूजा व आरती करण्यात आली. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला नाशिकची ग्रामदेवता कालिका मातेच्या मंदिरात तसेच गोदा घाटावरील सांडव्यावरची देवी व अन्य देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच अलोट गर्दी झाली होती.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी शहरातील मंदिरांत तसेच घरोघरी धार्मिक वातावरणात घटस्थापना झाली. सकाळी घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.शहरातील विविध भागात घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने थाटली होती.
नाशिकची ग्रामदैवता असलेल्या कालिकामातेच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. कालिका मंदिर संस्थानच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पहाटे देवीची महापूजा करण्यात आली. आरतीनंतर भाविकांची दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त गोदा घाटावरील सांडव्यावरची देवी, शालिमार येथील दुर्गामाता मंदिर, भद्रकालीतील देवी मंदिर, घनकर लेन येथील तुळजाभवानी मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. पहिल्या माळेला या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती.
बंदी डावलून दुकाने
कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा ताण यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशसनाने कालिका यात्रेत व्यावसायिकांना दुकाने लावण्यास परवानगी नाकारली. तरीही याठिकाणी दरवर्षीप्रमाणे छोट्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.