कोरोना काळात देशभरातून १३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 08:15 PM2021-01-04T20:15:11+5:302021-01-05T00:04:12+5:30
ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून देशासह विदेशात लॉकडाऊन असताना, दरातील चढ-उताराचे फटके सोसणाऱ्या कांद्याने या आर्थिक वर्षातील सहा महिन्यांत १३ लाख मेट्रिक टनांचा निर्यातीचा टप्पा पार केला आहे. कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १०५ दिवस कांदा निर्यात बंदी केली होती. आता पुन्हा कांद्याची निर्यात खुली झाली आहे, अद्यापही आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी तीन महिने बाकी असल्याने सन २०१८-१९चा कांदा निर्यातीचा आकडा पार करण्याची दाट शक्यता व्यक्त करत, कृषी क्षेत्रातील निर्यात ४३.३ टक्क्यांनी यंदा वाढल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणांमुळे कांद्याच्या निर्यातीत चढ-उतार दिसत असते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही कांदा निर्यातीत भरघोस वाढ झाली आहे. गेल्या उन्हाळ कांद्याचे १३० टक्के बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा देशा-विदेशात होत होता. उत्पादकांना कांद्याचे उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिल्याने, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते १४ सप्टेंबरपर्यंत कांद्याची १३ लाख सहा हजार ०२२.१३ मेट्रिक टन इतकी निर्यात झाली होती. त्यातून २ लाख ०९ हजार १००.८९ लाख रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे, तर सन २०१९-२० गेल्या आर्थिक वर्षात ११ लाख ४९ हजार ८९६.८४ इतकी निर्यात झाली होती, त्यातून २ लाख ३२ हजार ०६९.६३ लाख रुपये परकीय चलन मिळाले होते.
देशाची एकूण निर्यात आकडेवारी
२०१३-१४ - १४ लाख ८२ हजार मेट्रिक टन - ३,१६९ करोड
२०१४-१५ - १२ लाख ३८ हजार मेट्रिक टन - २,३०० करोड
२०१५-१६ - १३ लाख ८२ हजार मेट्रिक टन - ३,०९७ करोड
२०१६-१७ - २४ लाख १५ हजार मेट्रिक टन - ३,१०६ करोड
२०१७-१८ - १५ लाख ८८ हजार मेट्रिक टन - ३,०८८ करोड
२०१८-१९ - २१ लाख ८४ हजार मेट्रिक टन - ३,४६९ करोड
२०१९-२० - ११ लाख ५० हजार मेट्रिक टन - २३२१ करोड
२०२०-२१ - १३ लाख ०६ हजार मेट्रिक टन - २०१९ करोड (एप्रिल ते १४ सप्टेंबरपर्यंत)
या देशात होते कांदा निर्यात
बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सिंगापूर, इंडोनेशिया, कतार, कुवेत, मॉरिशस, सौदी अरेबिया, बेहरीन, ओमान, व्हिएतनाम, सोशल रिपब्लिक, मालदीव, युनायटेड किंगडम, रियुनियन, थायलंड, ब्रुनेई, रशिया, ग्रीस, हाँककाँग, पाकिस्तान, इटली, नेदरलँड्स, सेशल्स, कोमोरेझ, फ्रान्स, केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस आदी देशांसह एकूण ७६ देशांमध्ये कांदा निर्यात केला जातो.