ऐन उपवासाच्या काळात भगर तब्बल ३० रुपयांनी वाढली; भाजीपालाही तेजीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 01:22 AM2021-08-09T01:22:45+5:302021-08-09T01:24:31+5:30

श्रावण सुरू झाल्यानंतर ऐन उपवासाच्या काळात भगर, शेंगदाणा, साखर यांच्या दरात वाढ झाली असून, भगर किलोमागे ३० ते ३५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या साखरेच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून, १ ते दीड रुपया किलोमागे वाढला आहे. मागील सप्ताहापासून सुरू असलेली तेलाच्या दरातील तेजी कायम आहे. भाजीपाल्याच्या दरांमध्ये अद्याप तेजी कायम असून, हायब्रीडपेक्षा गावठी कोथिंबिरीला अधिक दर मिळत आहे.

During the fasting period, Bhagar increased by Rs. 30; Vegetables are also booming | ऐन उपवासाच्या काळात भगर तब्बल ३० रुपयांनी वाढली; भाजीपालाही तेजीतच

ऐन उपवासाच्या काळात भगर तब्बल ३० रुपयांनी वाढली; भाजीपालाही तेजीतच

googlenewsNext
ठळक मुद्देबाजार समितीत आवक घटली : किराणा बाजारात उत्साहाचे वातावरण

नाशिक : श्रावण सुरू झाल्यानंतर ऐन उपवासाच्या काळात भगर, शेंगदाणा, साखर यांच्या दरात वाढ झाली असून, भगर किलोमागे ३० ते ३५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या साखरेच्या दरात या सप्ताहात तेजी आली असून, १ ते दीड रुपया किलोमागे वाढला आहे. मागील सप्ताहापासून सुरू असलेली तेलाच्या दरातील तेजी कायम आहे. भाजीपाल्याच्या दरांमध्ये अद्याप तेजी कायम असून, हायब्रीडपेक्षा गावठी कोथिंबिरीला अधिक दर मिळत आहे. फळबाजारात आवक कमी असल्याने सर्वच फळांचे दर तेजीत आहेत. पावसाने ओढ दिल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे. गावठी कोथिंबिरीला २० रुपयांपासून १०४ रुपये जुडीपर्यंतचा दर मिळत आहे. सरासरी ६० रुपये जुडीला मिळत आहेत. इतर फळभाज्यांच्या दरामधील तेजी कायम असल्याने किरकाेळ बाजारात भाजीपाला ६० ते ८० रुपये किलोच्या खाली मिळत नाही. फळांच्या आवकेत घट झाली आहे. मात्र, मागणी कायम असल्यामुळे फळबाजारात तेजी दिसून आली आहे. निर्बंध शिथिल केल्यामुळे किराणा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

चौकट-

कांदापात ३२ रु. जुडी

पालेभाज्यांना मागणी चांगली आहे. त्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे सर्वच पालेभाज्या तेजीत आहेत. मेथी १५ पासून ३० पर्यंत, तर कांदा पात १४ पासून ३२ रुपयांपर्यंत जुडी विकली जात आहे. फळभाज्यांच्या दरातही तेजी कायम आहे. शनिवार, रविवार बाजारपेठेत अमावास्येचा परिणाम दिसून आला.

सफरचंद १५० रु. किलो

फळबाजारात आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात फळांचे दर चांगलेच वाढले आहेत. घाऊक बाजारात सफरचंद ८० ते १५० रुपये किलो, तर मृदुला डाळिंब ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. फळांना सर्वसामान्य ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.

चौकट-

साखरेत दीड रुपयाने वाढ

गेल्या अनेक दिवसांपासून साखरेचे दर स्थिर होते. मात्र, उपवास आणि सणासुदीचे दिवस सुरू होताच साखरेच्या दरात एक ते दीड रुपयाने वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून डाळींचे दर स्थिर असून, बाजारात खरेदीची उत्साह असल्याचे दिसून आले.

कोट-

निर्बंध शिथिल झाल्यामुळे किराणा बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. सर्व वस्तू सर्वच ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत खरेदी करावी, विनाकारण कोठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. - अनिल बुब, किराणा व्यापारी

कोट-

श्रावणमासाला प्रारंभ होताच भगरीच्या दरात झालेल्या वाढीने सर्वसामान्यांचा फराळही महागला आहे. भाजीपाला तर गेल्या काही दिवसांपासून महागच घ्यावा लागतो. हे सर्व करताना गृहिणींना मात्र खर्चाची कसरत करावी लागत आहे. - मंदा बर्वे, गृहिणी

कोट-

पिकांच्या ऐन माेसमात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे भाजीपाला पिकविताना शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे - प्रवीण गायकवाड, शेतकरी

Web Title: During the fasting period, Bhagar increased by Rs. 30; Vegetables are also booming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.